नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल ७ हजार गुंगीकारक गोळ्या पुणे पोलिसांकडून जप्त; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:48 IST2025-12-01T16:46:41+5:302025-12-01T16:48:02+5:30
आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणाहून औषधसाठा मागवत असल्याचे व कोंढवा, काशेवाडी, हडपसर, कॅम्प, येरवडा परीसरात नशेसाठी गोळ्या विक्री करत असल्याचे दिसून आलं

नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल ७ हजार गुंगीकारक गोळ्या पुणे पोलिसांकडून जप्त; दोघांना अटक
पुणे: नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल सात हजार गुंगीकारक औषधी गोळ्या पुणेपोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश येथून कुरिअर मार्फत या गोळ्या मागवून पुणे शहरातील विविध परिसरात विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर हमीद शेख (वय ४०) आणि सुनिल गजानन शर्मा (वय ३४) अशी आरोपींची नाव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांना गोपनीय बातमीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून २५ नोव्हेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरात एका दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना अडवलं. त्यांची चौकशी आणि झडती घेतली असता ते ही गुंगीच्या औषधाची विक्री करत असल्याचं आढळून आलं. त्यांच्या दुचाकीच्या डिक्की मध्ये तसेच कोंढवा येथील राहत्या घरात NITRAZEPAM TABLET IP NITZASCEN-10, Alprazolam Tablet I.P 0.5 mg, ALPRASCEN-0.5, NITRAZEPAM TABLET IP NITRAFAST-10 या अंमली पदार्थाच्या एकूण ६९०० गोळ्या मिळून आल्या आहेत. त्यांच्याकडून सदर अंमली पदार्थाच्या गोळ्या, दुचाकी असा एकूण दिड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. अंमली पदार्थ असलेल्या औषधी गोळया विनापरवाना व डॉक्टरांच्या प्रिस्क्रीपशनशिवाय नशेसाठी खरेदी-विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणाहून औषधसाठा मागवत असल्याचे व कोंढवा, काशेवाडी, हडपसर, कॅम्प, येरवडा परीसरात नशेसाठी गोळ्या विक्री करत असल्याचे दिसून आलं..