पुणे पोलिसांनी उद्धवस्त केले मध्य प्रदेशातील शस्त्रसाठ्यांंचे अड्डे; २१ पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 19:05 IST2025-11-22T19:05:07+5:302025-11-22T19:05:35+5:30
ताब्यात घेतलेल्या ३६ जणांकडे चौकशी सुरु असून पुणे पोलिसांनी दुसऱ्या राज्यात जाऊन बेकायदा शस्त्रांवर केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे

पुणे पोलिसांनी उद्धवस्त केले मध्य प्रदेशातील शस्त्रसाठ्यांंचे अड्डे; २१ पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त
पुणे : विमानतळ येथील गुन्ह्यांच्या अनुषंगाने पुणेपोलिसांच्या १०५ जणांच्या पथकाने मध्यप्रदेशातील उमरटी या गावात कारवाई करून शस्त्रसाठ्यांचे अड्डे आणि शस्त्र बनविणाऱ्या ५० भट्ट्या नष्ट केल्या आहेत. या कारवाईत पुणे पोलिसांनी ड्रोन, मेटल डिटेक्टरसह मध्यप्रदेश पोलिसांची मदत घेऊन शनिवारी दुपारपर्यंत ३६ जणांना ताब्यात घेतले असून २१ पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त केला आहे. या माध्यमातून पुणे पोलिसांनी एक मोठे आंतरराज्यीय अवैध शस्त्रास्त्र पुरवठा व तस्कारी करणारे रॅकेट उद्धवस्त केले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये शहरात विमानतळ पोलीस ठाणे, काळेपडळ, खंडणी विरोधी पथक आणि खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा आदींच्या कारवाईत एकूण २१ शस्त्रे जप्त करण्यात आली होती. विमानतळ पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना ही सर्व शस्त्रे मध्यप्रदेशातील उमरटी या गावातून येत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार परिमंडळ चार चे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण तसेच परिमंडळ ४ मधील इतर अधिकारी, २० सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, परिमंडळ ४ आणि गुन्हे शाखेचे ५० जवान यांच्याबरोबर पोलीस मुख्यालयातील १ गॅस गन विभाग आणि शहर पोलिसांची वायरलेस आणि सीसीटीव्ही पथक असे १०५ जणांचे पथक मध्यप्रदेशात दाखल झाले होते. कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि मोहिमेच्या यशाची खात्री करण्यासाठी, पुरेशा शस्त्रासह स्पेशल क्विक रिस्पॉन्स टीम देखील तैनात करण्यात आल्या होत्या. उमरटी गावाजवळ गेल्यानंतर पोलिसांनी अगोदर ड्रोनचा वापर करुन संपूर्ण परिसराची पहाणी केली. त्यानंतर शनिवारी पहाटे अचानक या गावावर छापा टाकून बेकायदा शस्त्र बनविणारे कारखाने असलेल्या ५० घरांमध्ये पोलिसांनी जाऊन झडती घेतली. तेथील पिस्तुले तयार करण्याचे साहित्य, शस्त्राचे सुटे भाग जप्तन केले. धातू तयार करण्यासाठी बनविलेल्या भट्ट्या नष्ट केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, मदन कांबळे, कल्याणी कासोदे, पोलीस अंमलदार पठाण, देशमुख, काशिनाथ कारखेले, नितीन मुंढे, पवार, तांबेकर, रोकडे, रणपिसे, माने, खरात, पानसरे यांच्यासह १०५ जणांच्या पथकाने केली.
उमरटी गावात शनिवारी पहाटे नियोजनपूर्वक छापा घातला. काही जणांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला. पण, आपला फौजफाटा मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना काही करता आले नाही. मध्य प्रदेश पोलिसही येथे नेहमी कारवाई करत असतात. पण, पुणे पोलिसांनी ही दुसऱ्या राज्यात जाऊन बेकायदा शस्त्रांवर केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. अजूनही ही कारवाई सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या ३६ जणांकडे चौकशी सुरु आहे. त्यांच्यातील ज्यांची यामध्ये महत्वाची भूमिका आहे, असे चौकशीत दिसून येईल, त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. - सोमय मुंडे, परिमंडळ चार, पोलिस उपायुक्त.
उमरटी गावातील कारवाई अजूनही सुरू आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर नेमके किती जणांना ताब्यात घेतले व किती शस्त्रे व दारुगोळा जप्त केला याची माहिती समजणार आहे. या कारवाईत मध्यप्रदेश पोलिसांचीही मदत झाली आहे. कारवाईसाठी मोबाईल सर्व्हेलन्स, व्हेईकल्स, तात्पुरते वायरलेस नेटवर्क, बुलेट प्रुफ जॅकेट आणि बॉडी वॉर्न कॅमेरे, ड्रोन याची मदत घेण्यात आली. - रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त