लाईट गेली की मोबाइल नेटवर्कही गायब; बारामती ग्रामीण भागातील नागरिक हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 13:01 IST2026-05-12T13:00:50+5:302026-05-12T13:01:32+5:30

- ग्रामीण भागातील नागरिकांचे दैनंदिन व्यवहार आता मोठ्या प्रमाणावर मोबाइल आणि इंटरनेटवर अवलंबून झाले आहेत.

pune news when the electricity goes out, the mobile network also disappears citizens of rural areas of Baramati are shocked | लाईट गेली की मोबाइल नेटवर्कही गायब; बारामती ग्रामीण भागातील नागरिक हैराण 

लाईट गेली की मोबाइल नेटवर्कही गायब; बारामती ग्रामीण भागातील नागरिक हैराण 

मोरगाव : बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होताच मोबाइल टॉवर सेवादेखील बंद पडत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विविध मोबाइल कंपन्यांच्या टॉवरवर बसविण्यात आलेल्या बॅकअप यंत्रणा, जनरेटर आणि बॅटरी व्यवस्था अनेक ठिकाणी बंद अवस्थेत असल्याने काही मिनिटांतच मोबाइल नेटवर्क गायब होत असून, कॉल, इंटरनेट आणि ऑनलाइन सेवा पूर्णपणे ठप्प होत आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांचे दैनंदिन व्यवहार आता मोठ्या प्रमाणावर मोबाइल आणि इंटरनेटवर अवलंबून झाले आहेत. शासकीय कामे, बँक व्यवहार, ऑनलाइन पेमेंट, विद्यार्थ्यांचा अभ्यास, तसेच आपत्कालीन संपर्कासाठी मोबाइल सेवा अत्यावश्यक बनली आहे. मात्र, वीज गेल्यानंतर लगेचच नेटवर्क बंद पडत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर काही वेळातच “नो सर्व्हिस”, अशी स्थिती निर्माण होत आहे. इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद पडत असल्याने ऑनलाइन व्यवहार अर्धवट राहत आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, व्यापाऱ्यांचे डिजिटल व्यवहार आणि नागरिकांचे महत्त्वाचे संपर्क यावर याचा थेट परिणाम होत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक मोबाइल टॉवरवर काही तास चालणारी बॅटरी किंवा जनरेटर सुविधा असणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक ठिकाणी या यंत्रणांची योग्य देखभाल होत नसल्याचे दिसून येत आहे. काही टॉवरवर जनरेटर उपलब्ध असूनही ते सुरू केले जात नसल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. परिणामी वीजपुरवठा खंडित होताच संपूर्ण नेटवर्क व्यवस्था कोलमडते.

ग्रामीण भागात आपत्कालीन परिस्थितीत मोबाइल सेवा बंद पडणे धोकादायक ठरू शकते. वैद्यकीय मदत, पोलिस संपर्क किंवा इतर तातडीच्या सेवांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळा आणि वादळी वातावरणात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनत आहे.

दरम्यान, संबंधित मोबाइल कंपन्या आणि दूरसंचार विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्येक टॉवरवरील बॅकअप यंत्रणा कार्यान्वित ठेवाव्यात, नियमित देखभाल करावी आणि सेवा खंडित होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Web Title : बारामती में बिजली कटौती के दौरान मोबाइल नेटवर्क गायब।

Web Summary : बारामती के ग्रामीण इलाकों में बिजली कटौती से मोबाइल नेटवर्क बाधित है। सेल टावरों पर बैकअप सिस्टम विफल होने से संचार और आवश्यक ऑनलाइन सेवाएं बाधित हैं, जिससे निवासियों को कठिनाई हो रही है।

Web Title : Baramati villagers face mobile network outage during power cuts.

Web Summary : Power outages in Baramati's rural areas disrupt mobile networks. Backup systems at cell towers often fail, hindering communication and essential online services, causing hardship for residents.