Video: पुण्यातील सोसायटीत खेळणाऱ्या मुलावर ३ ते ४ कुत्र्यांची झडप; CCTV मध्ये धक्कादायक घटना कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:14 IST2026-02-20T16:13:16+5:302026-02-20T16:14:03+5:30
- सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या चिमुरड्याकडे अचानक 3-4 भटके कुत्रे धावत आले.

Video: पुण्यातील सोसायटीत खेळणाऱ्या मुलावर ३ ते ४ कुत्र्यांची झडप; CCTV मध्ये धक्कादायक घटना कैद
पुणे - पुण्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून किरकटवाडी परिसरातील चैत्रांगण सोसायटीत एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या चिमुरड्याकडे अचानक 3-4 भटके कुत्रे धावत आले. त्यानंतर त्यांनी काही क्षणांत मुलावर झडप घालत चावा घेण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलाने आरडाओरड केल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत त्याला वाचवले. सुदैवाने मुलगा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रहिवाशांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांचा संताप
परिसरातील नागरिकांनी सांगितले की, किरकटवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रात्रीच्या वेळी आणि सकाळी फिरणाऱ्या लोकांना तसेच मुलांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने कुत्र्यांचे लसीकरण, निर्बंध आणि पुनर्वसन यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.