मतदार यादी पडताळणीत ‘लेकी-सुनांची’ कोंडी; २००२ नोंदी शोधण्यासाठी माहेराची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 14:01 IST2026-05-01T14:01:17+5:302026-05-01T14:01:35+5:30
- एसआरआय मोहिमेत मॅपिंग अनिवार्य; कागदपत्रांअभावी नाव वगळले जाण्याची भीती

मतदार यादी पडताळणीत ‘लेकी-सुनांची’ कोंडी; २००२ नोंदी शोधण्यासाठी माहेराची धावपळ
बारामती : निवडणूक आयोगाच्या मतदार विशेष पुनरावलोकन (एसआरआय) मोहिमेमुळे मतदार यादी अधिक अचूक करण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी या प्रक्रियेत विशेषतः लग्न होऊन सासरी गेलेल्या लेकी-सुनांची मोठी कोंडी होत आहे. २००२ च्या मतदार यादीतील नोंदी आणि २०२४ च्या यादीचे मॅपिंग करण्याची अट असल्याने अनेक महिलांना माहेरच्या गावातील जुनी कागदपत्रे शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ही मोहीम वेगाने राबवली जात असून, मतदार यादीतील अचूकता वाढवण्यासाठी जुन्या नोंदींची पडताळणी केली जात आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेक महिलांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने नाव वगळले जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
विवाहित महिलांसाठी वडिलांच्या नावाशी मॅपिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी २००२ सालच्या मतदार यादीतील नाव, गाव, तालुका, जिल्हा, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक आवश्यक आहे. संबंधित माहिती उपलब्ध न झाल्यास निवडणूक शाखेकडून नोटीस देऊन सुनावणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. गैरहजेरी ठेवल्यास मतदार यादीतून नाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरवर्षीप्रमाणे या विशेष पुनरावलोकन मोहिमेत नवीन मतदार नोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे यावर भर दिला जातो. दुबार नोंद टाळण्यासाठी २००२ आणि २०२४ च्या यादीचे मॅपिंग करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे अनेक महिला माहेर गाठून जुने दाखले, शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदार यादीतील नोंदी शोधत असल्याचे चित्र दिसत आहे. बीएलओ घरभेटी देऊन कागदपत्रांची पडताळणी करत असून काही ठिकाणी ऑनलाइन पद्धतीचाही वापर सुरू आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदार असून त्यापैकी २ लाख ६१ हजार ६२५ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. म्हणजेच ६८.०३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “मतदार यादी अचूक ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः महिलांनी बीएलओशी संपर्क साधून आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या २००२ च्या मतदार यादीतील तपशील देऊन मॅपिंग पूर्ण करावे.”
पर्यायी कागदपत्रे ग्राह्य
जुनी नोंद उपलब्ध नसल्यास खालील कागदपत्रे सादर करता येणार आहेत :
आधारकार्ड
पॅनकार्ड
शाळा सोडल्याचा दाखला
जन्मदाखला
विवाह नोंदणी प्रमाणपत्र
रेशनकार्ड