ग्राउंड रिपोर्ट : पंतप्रधान मोदी म्हणतात ते पुणेकरांना जमेल का?

By अजित घस्ते | Updated: May 12, 2026 09:41 IST2026-05-12T09:35:58+5:302026-05-12T09:41:12+5:30

- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे ‘तीन-तेरा’ अन् प्रवाशांना आता 'कार पोलिंग'चाच सहारा

pune news ground Report: Will Punekars like what Prime Minister Modi says? | ग्राउंड रिपोर्ट : पंतप्रधान मोदी म्हणतात ते पुणेकरांना जमेल का?

ग्राउंड रिपोर्ट : पंतप्रधान मोदी म्हणतात ते पुणेकरांना जमेल का?

पुणे : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांना इंधन बचतीसाठी खासगी गाड्यांचा वापर टाळून मेट्रो किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, असे आवाहन केले आहे. मात्र, पेट्रोल, डिझेलचा मर्यादित वापर करणे पुणेकरांना खरंच जमेल का? हा खरा प्रश्न आहे. विद्येचे माहेरघर आणि आयटी हब अशी ओळख असलेल्या पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. पीएमपीएल बसची अपुरी संख्या, ब्रेकडाऊन होण्याचे वाढते प्रमाण, बस ठरावीक वेळेत मार्गावर न पोहोचणे, इच्छित मार्गावर मेट्रो नसणे, अशा त्रुटींमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही सक्षम पर्याय ठरू शकत नसल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे. त्यामुळे नोकरदार आणि सामान्य नागरिक ‘कार पोलिंग’ या पर्यायाकडे वळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शहरातील मेट्रोचे काम आणि वाहतूककोंडी

शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले असून, वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यातच स्वारगेट, हिंजवडी, विमाननगर आणि कोथरूड, आदी भागांत सकाळी आणि संध्याकाळी होणारी वाहतूक कोंडी पाहता, सार्वजनिक बसने प्रवास करणे म्हणजे वेळेचा अपव्यय ठरत आहे. अशावेळी स्वतःच्या वाहनाने जाणे परवडत नसले तरी, दुसरा पर्याय नागरिकांकडे नाही. विशेष म्हणजे, शहरात ठरावीक मार्गावरच मेट्रो धावत असल्याने इतर मार्गावरील नागरिकांना पर्यायी मार्गाचा विचार करावा लागत आहे. जेथे मेट्रोची सोय आहे, त्या मार्गावर आयटी हब, प्रोजेक्ट नाहीत. हिंजेवडी पार्क, सिंहगड रस्ता आणि विमानतळ या मार्गावर नागरिकांना मेट्रोची गरज आहे, तेथे मात्र अद्याप सुविधा सुरू नाही. अशावेळी पुणेकरांना खासगी वाहनांचा वापर करण्याशिवाय पर्यायच नाही.

याच मार्गावर धावते मेट्रो
- स्वारगेट ते पिंपरी चिंचवड
- वनाझ ते रामवाडी

'पीएमपीएल'चा विस्कळीत कारभार

पुणे शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या पीएमपीएल बससेवेची अवस्थाही अत्यंत दयनीय आहे. अनेक मार्गांवर बस वेळेवर पोहोचत नाहीत, तर काही मार्गांवर गाड्यांची संख्या इतकी कमी आहे की प्रवाशांना तासन् तास ताटकळत उभे राहावे लागते. बसमध्ये होणारी प्रचंड गर्दी आणि वारंवार बंद पडणाऱ्या बस यामुळे प्रवाशांचा पीएमपीवरून विश्वास उडाला आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक असली तरीही ती सक्षम पर्याय ठरत नसल्याचा सूर पुणेकरांनी लावला आहे.

शहरातील सायकल ट्रॅक गायब
पुणे शहराला पूर्वी सायकलचे शहर म्हणून ओळखले जायचे. मात्र, अलीकडे सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, हडपसर, विद्यापीठ मार्गावरील सायकल ट्रॅक अस्तित्वातच नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवरील सायकल ट्रॅक गायब झाल्याने सायकलस्वारांना मुख्य रस्त्यांवरून धोकादायकरीत्या सायकल चालवावी लागत आहे.
‘कारपोलिंग’ काळाची गरज
सार्वजनिक वाहतुकीचे 'तीन-तेरा' वाजल्याने पुणेकरांनी आता स्वतःहूनच मार्ग शोधला आहे. विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि एकाच कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांनी 'कार पोलिंग'चा मार्ग स्वीकारावा लागणार आहे.

-खर्चात बचत
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता, एकाच कारमधून ४-५ जणांनी प्रवास केल्यास इंधनाचा खर्च विभागला जातो. यामुळे पुणेकरांनी कार पोलिंगचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. कार पोलिंगचा पर्याय अधिक प्रभावीपणे वापरल्यास तो नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

- पुणेकर म्हणतात...
महानगरपालिकेने आणि पीएमपीएल प्रशासनाने वाहतूक कोंडीवर उपाय काढण्याऐवजी फक्त आश्वासने दिली आहेत. मेट्रो पूर्ण होईपर्यंत आम्ही काय करायचे? त्यामुळे आम्ही चार मित्रांनी मिळून आता एकाच कारने ऑफिसला जाणे सुरू केले आहे. - पुष्पक मोरे, आयटी कर्मचारी.

Web Title : खराब सार्वजनिक परिवहन के बीच पुणे ईंधन संरक्षण से जूझ रहा है।

Web Summary : खराब सार्वजनिक परिवहन के कारण पुणे ईंधन उपयोग को कम करने के लिए संघर्ष कर रहा है। अधूरी मेट्रो लाइनें और अविश्वसनीय बसें नागरिकों को निजी वाहनों पर निर्भर रहने के लिए मजबूर करती हैं। कारपूलिंग एक आवश्यकता के रूप में उभर रहा है।

Web Title : Pune grapples with fuel conservation amid inadequate public transport.

Web Summary : Pune struggles to reduce fuel use due to poor public transport. Incomplete metro lines and unreliable buses force citizens to rely on private vehicles. Carpooling is emerging as a necessity.