सिंहगड संवर्धनात ऐतिहासिक तोफगोळ्याचा शोध; कल्याण दरवाजाच्या बुरुजात दडलेली रणसंग्रामाची नवी साक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 10:26 IST2026-04-14T10:25:19+5:302026-04-14T10:26:12+5:30
सिंहगड संवर्धनात ऐतिहासिक तोफगोळ्याचा शोध; कल्याण दरवाजाच्या बुरुजात दडलेली रणसंग्रामाची नवी साक्ष

सिंहगड संवर्धनात ऐतिहासिक तोफगोळ्याचा शोध; कल्याण दरवाजाच्या बुरुजात दडलेली रणसंग्रामाची नवी साक्ष
खडकवासला : सिंहगडावर सुरू असलेल्या गडसंवर्धनाच्या कामात पुन्हा एकदा इतिहासाच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. कल्याण दरवाज्याजवळील ढासळलेल्या बुरुजात साधारणतः ४-५ इंच व्यासाचा प्राचीन तोफगोळा आढळून आला असून, हा अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा मानला जातोय.
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगडावर भूतकाळात अनेक लढाया झाल्या. त्याचे पुरावे, म्हणून या आधीही गडाच्या तटबंदीचे बांधकाम करताना जुने तोफगोळे, तोफा आणि अन्य युद्धसामग्री सापडल्याची नोंद आहे. नव्याने सापडलेला हा तोफगोळा या इतिहासाला अधिक अधोरेखित करणारा शिवकालीन रणसंग्रामाची साक्ष आहे.
संवर्धनातून मिळणार इतिहासाला उजाळा
सध्या राज्य पुरातत्व खात्याच्या वतीने कल्याण दरवाज्याचे संवर्धन ऐतिहासिक शैलीत वेगाने सुरू आहे. तटबंदीचे पारंपरिक बांधकाम, दगडी रचना आणि मूळ आराखड्याचा अभ्यास करताना इतिहासकालीन रणसंग्रामाच्या अनेक खुणासमोर येऊ लागल्या आहेत. जुन्या तटबंदीमध्ये अडकलेले शस्त्रसामग्रीचे अवशेष हे गडावर ताबा मिळविण्याच्या संघर्षातून झालेल्या लढायांचे जिवंत पुरावेच ठरत आहेत. या तोफगोळ्याचा शोध हा फक्त पुरातन अवशेष सापडण्यापुरता मर्यादित नसून सिंहगडाच्या लढायांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा आहे.
गड संवर्धनामुळे अशा ऐतिहासिक खुणासमोर येत असल्याने शिवकालीन, तसेच ब्रिटिशकालीन युद्धकलेचा पुरावे उजेडात येत आहे. सिंहगडाचा इतिहास अधिक समृद्ध, अभ्यासनीय आणि ठोस पुराव्यांसह जगासमोर उभा राहण्यास हे मोठे पाऊल ठरणार आहे. शिवकालीन युद्धतंत्र, तोफखाना आणि रणकौशल्य समजून घेण्यासाठी असे पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
कल्याण दरवाजाच्या बुरुजात घट्ट रुतलेला हा तोफगोळा काळजीपूर्वक बाहेर काढून त्याचा आकार, धातू, वजन, तोफेची दिशा आदी बाबींचे विश्लेषण करून त्याची माहिती लवकरच प्रसिद्ध करू - डॉ. विलास वाहणे, सहायक संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग
इतिहासात सिंहगडावर तोफगोळ्यांचा मारा करण्याच्या दोन घटना प्रसिद्ध आहेत. पहिली घटना म्हणजे डिसेंबर १७०२ साली औरंगजेबाच्या सैन्याने सिंहगडाला वेढा घातला होता, जो एप्रिल १७०३ पर्यंत होता. यादरम्यान गडावर मोगल सैन्याने तोफगोळ्यांचा मारा केल्याचे उल्लेख मिळतात. दुसरी घटना म्हणजे ब्रिटिशांनी मार्च १८१८ मध्ये सिंहगडावर हजारो तोफगोळ्यांचा मारा करून सिंहगड ताब्यात घेतला होता. या दोन घटनांपैकी कुठल्यातरी एका आक्रमणाची साक्ष देणारा हा तोफगोळा असू शकतो. - डॉ. नंदकिशोर मते, सिंहगड अभ्यासक