कामगार कायद्यातील बदल कामगारविरोधी ठरू नयेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:43 IST2026-05-07T13:42:58+5:302026-05-07T13:43:17+5:30
सेरांग यांनी यावेळी उपस्थित कामगार प्रतिनिधींबरोबर वैयक्तिक चर्चा करत त्यांचे प्रश्न समजावून घेतले.

कामगार कायद्यातील बदल कामगारविरोधी ठरू नयेत
पुणे : कामगार क्षेत्रात जगभरात अनेक बदल होत आहेत, भारतातही नवे कामगार कायदे लागू झाले आहेत, मात्र असे बदल होताना ते कामगारविरोधी किंवा कामगारांचे हित धोक्यात आणणारे होऊ नयेत, यासाठी कामगार संघटनांनी जागृत राहायला हवे, असे मत इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (आयटीएफ) या जागतिक संघटनेचे भारतातील अध्यक्ष अब्दुलगनी सेरांग यांनी व्यक्त केले.
फेडरेशनशी संलग्न असलेल्या पुण्यातील राष्ट्रीय मजदूर संघटनेच्या कार्यालयाला सेरांग यांनी रविवारी भेट दिली. यावेळी पुणे शहरातील मेट्रो कर्मचारी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, पीएमपीलमधील कर्मचारी, तसेच महापालिकेतील कचरा वाहतुकीच्या वाहनांवर काम करणाऱ्या चालकांबरोबर त्यांनी चर्चा केली. संघाचे अध्यक्ष नगरसेवक सुनिल शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. संघटक विशाल बागूल यांनी प्रास्तविक केले. सेरांग यांनी यावेळी उपस्थित कामगार प्रतिनिधींबरोबर वैयक्तिक चर्चा करत त्यांचे प्रश्न समजावून घेतले.
कामगार आमूलाग्र बदल होत आहेत. कामगार संघटनांनी लढा देत मिळवलेल्या अनेक हक्कांवर त्यामुळे गदा येत आहे. या सर्व परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. बदल होत राहणारच, पण त्या अनुषंगाने तयार होणारे कायदे कामगारांचे नुकसान करणारे होणार नाहीत हेही पाहणे महत्त्वाचे आहे. कारण, कायदे तयार करणाऱ्यांवर कामगारांपेक्षाही भांडवलदारांचा अधिक प्रभाव असतो, अशी टीकाही सेरांग यांनी केली.
भारताविषयी बोलताना ते म्हणाले, “इथेही अनेक बदल होत आहेत. विशेषत: वेगवेगळ्या कामगार कायद्यांचे एकत्रिकरण करून सरकारने ४ स्वतंत्र कामगार संहिता तयार केल्या आहेत. वास्तविक त्या करताना कामगार संघटनांना विश्वासात घेणे गरजेचे होते, मात्र तसे झालेले नाही. त्यामुळेच आता या कामगार संहिता लागू झाल्यानंतर कामगार क्षेत्रातून त्याविषयी रोष निर्माण होताना दिसत आहे. यासाठी आधीच अशा घडामोडींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते.” वाहतूक क्षेत्रातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एकत्र येऊन काही करता येईल का? याचा आराखडा तयार करण्यात येईल, असे सेरांग यांनी सांगितले.
कामगार कायद्यात आमूलाग्र बदल होत आहेत. कामगार संघटनांनी लढा देत मिळवलेल्या अनेक हक्कांवर त्यामुळे गदा येत आहे. या सर्व परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. बदल होत राहणारच, पण त्या अनुषंगाने तयार होणारे कायदे कामगारांचे नुकसान करणारे होणार नाहीत, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. कारण, कायदे तयार करणाऱ्यांवर कामगारांपेक्षाही भांडवलदारांचा अधिक प्रभाव असतो, असे सेरांग म्हणाले.