पुणे : नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत तिच्या खूनप्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. यासाठी न्यायालयात फिर्यादी पक्षाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या विधि आणि न्याय विभागाला पाठविला आहे. यामध्ये तीन वकिलांची नावे पोलिसांनी सुचविली आहेत. त्यापैकी एकाची नियुक्ती करण्यात येईल, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हा खटला सक्षमपणे चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, नाशिकचे अजय निसार यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
नसरापूर प्रकरणातील पीडितेला जलद न्याय मिळण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याबरोबरच आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पीडितेच्या वडिलांनी फोनवरून ॲड उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधला असल्याचे कळते. या खटल्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांचीच नियुक्ती करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. मात्र, ॲड. उज्ज्वल निकम हे भाजपचे खासदार असल्याने त्यांना व्यस्ततेतून किती वेळ मिळेल, अशी शंका असल्याने पोलिसांनी या खटल्यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांना ॲड. अजय निसार यांच्यासह आणखी दोन वकिलांची नावे सुचविली आहेत.
या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे यास न्यायालयाने दि. ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सध्या सरकार पक्षातर्फे अरुंधती ब्रह्मे कामकाज पाहत आहेत. येत्या काळात शासनाकडून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक झाली तर पुढील सुनावणीस ब्रह्मे यांच्यासह विशेष सरकारी वकिलांकडून फिर्यादीची बाजू मांडण्यात येईल.
नसरापूर येथील मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने ती ओरडू नये म्हणून मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबला, तसेच झटापटीत पीडितेच्या छातीवर वळ उमटल्याचे शवविच्छेदनात निदर्शनास आले आहे. ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिली. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी ठेवण्यात आले आहेत.
ससून रुग्णालयात या प्रकरणातील आरोपीची सक्षमता तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा जलग गतीने तपास सुरू असल्याने सक्षमता तपासणीचा अहवाल तातडीने सादर करण्याची सूचना पोलिसांनी रुग्णालयाकडे केली आहे. त्यानुसार पोलिस प्रशासनाला या तपासणीचा अहवाल तातडीने देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Web Summary : Following outrage over the Nasrapur case, the police have proposed three lawyers for special public prosecutor. Ujjwal Nikam and Ajay Nisar's names are under consideration. The fast-track trial aims for capital punishment, as assured by the Chief Minister. The victim's family prefers Nikam.
Web Summary : नसरापुर मामले पर आक्रोश के बाद, पुलिस ने विशेष सरकारी वकील के लिए तीन वकीलों का प्रस्ताव रखा है। उज्ज्वल निकम और अजय निसार के नामों पर विचार किया जा रहा है। मुख्यमंत्री द्वारा दिए गए आश्वासन के अनुसार, फास्ट-ट्रैक ट्रायल का लक्ष्य मृत्युदंड है। पीड़ित परिवार निकम को पसंद करता है।