Pune Nasrapur Case: नसरापूर बालिका अत्याचार व हत्या प्रकरण; २१ मे पासून विशेष न्यायालयात इन- कँमेरा सुनावणी सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 18:34 IST2026-05-18T18:33:32+5:302026-05-18T18:34:42+5:30
Pune Nasrapur Case सीसीटिव्ही फुटेजेस, एफ्.एस.एल रिपोर्टस , वैद्यकीय अहवाल अशा पुराव्यांचे तब्बल ११०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे

Pune Nasrapur Case: नसरापूर बालिका अत्याचार व हत्या प्रकरण; २१ मे पासून विशेष न्यायालयात इन- कँमेरा सुनावणी सुरु होणार
पुणे: नसरापूर (ता. भोर) येथील अवघ्या तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले असून, येत्या २१ मे पासून नियमित सुनावणी घेत जलद गतीने या खटल्याची सुनावणी होणार आहे. खटल्याचे गांभीर्य आणि पीडितेचे वय लक्षात घेता, ही सुनावणी इन- कँमेरा घेतली जाणार आहे.
जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या विशेष न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात या खटल्याची सुनावणी पार पडणार आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने रात्रंदिवस मेहनत घेऊन घटनेच्या अवघ्या १४ दिवसांत तब्बल ११०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. सीसीटिव्ही फुटेजेस, एफ्.एस.एल रिपोर्टस , वैद्यकीय अहवाल तसेच मयतास आरोपी सोबत शेवटचे बघण्यात आल्याबाबतचा पुरावा यावर दोषारोपपत्र आधारलेले आहे. तपासात अतिशय उच्च दर्जाची तांत्रिक पद्धत अवलंबून तंत्रशुद्ध पद्धतीने तपास करण्यात आला असून, तपासाकामी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली. खटल्याच्या सुरुवातीसच न्यायालयाने घटनास्थळाची पाहणी करावी, अशी विनंती अॅड. अजय मिसर यांच्यामार्फत न्यायालयात करण्यात आली आहे. खटल्याची सुनावणी देखील रेकाँर्ड कालावधीत पूर्ण केली जाईल. तसेच आरोपीस कठोर शासन करुन पीडिता व तिच्या कुटुंबियास न्याय दिला जाईल असा विश्वास विशेष सरकारी वकील अँड मिसर यांनी व्यक्त केला.