Pune: 'कार घेऊन घरी जाऊ नका', न ऐकताच शहाणपणा केला; मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत कर्मचाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:02 IST2025-12-01T12:35:48+5:302025-12-01T13:02:33+5:30
कल्याणीनगर भागात एका आयटी कंपनीत असणाऱ्या मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Pune: 'कार घेऊन घरी जाऊ नका', न ऐकताच शहाणपणा केला; मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत कर्मचाऱ्याचा मृत्यू
पुणे : कल्याणीनगर भागात रविवारी दुपारी मद्यधुंद कारचालकाने पबमधील एका कर्मचाऱ्याला धडक दिली. अपघातात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालक शहरातील एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. सत्येंद्र मंडल (३०, मूळ रा. बिहार) असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी कारचालक प्रतापसिंह काईंगडे (४९, रा. धानोरी) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काईंगडे मूळचा नवी मुंबईतील आहे. तो नेरूळ भागातील एका सोसायटीात राहायला आहे. सध्या तो धानोरी भागात राहायला आहे. तो रविवारी दुपारी कल्याणीनगर भागातील एका पबमध्ये आला होता. तेथे त्याने मद्यप्राशन केले. दुपारी तीनच्या सुमारास तो पबमधून बाहेर पडला. पबमधील ‘वॅले पार्किंग’ मध्ये कार लावली होती. काईंगडेने मद्यप्राशन केले होते. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेतील काईंगडेला कर्मचाऱ्यांनी कार घेऊन घरी जाऊ नका, असे सांगितले. कॅब ने घरी जा, असे सांगितले, अशी माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली. त्यानंतरही काईंगडे याने ‘वॅले पार्किंग’मघून कार काढली. तो धानोरीकडे जाण्यास निघाला. कार मागे घेत असताना मद्यधुंद अवस्थेतील कारचालक काईंगडे याचे नियंत्रण सुटले आणि मागे थांबलेला पबमधील कर्मचारी सत्येंद्र मंडल याला त्याने धडक दिली. त्यात मंडल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे पोलिस निरीक्षक बागवान यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. आराेपी प्रताप काईंगडे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली.