Pune crime: बारामतीत खळबळ...! पोक्सो आरोपीने पोलिस कोठडीत उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 09:58 IST2026-04-29T09:58:16+5:302026-04-29T09:58:25+5:30
Pune crime: अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण; बेकायदेशीर गर्भपातामुळे डॉक्टरांवरही संशय

Pune crime: बारामतीत खळबळ...! पोक्सो आरोपीने पोलिस कोठडीत उचललं टोकाचं पाऊल
सोमेश्वरनगर (पुणे जि.) :बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने पोलिस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
रवींद्र व्यंकट गार्डी (वय ४८, रा. चव्हाण वस्ती, कोऱ्हाळे खुर्द, ता. बारामती) असे मृत आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपीवर आपल्या नात्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप होता. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती झाल्याची बाब समोर आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात या अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आल्याचे उघड झाले. ही माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. २४ एप्रिल रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपीला ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजता कर्तव्यावरील पोलिस कर्मचारी काही वेळासाठी बाहेर गेल्याचा फायदा घेत आरोपीने पांघरुणासाठी दिलेल्या चादरीची किनार फाडून दोर तयार केला आणि गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्याला तत्काळ होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी करत आहेत. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपासासाठी गुन्हा गुन्हे अन्वेषण पथकाकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डॉक्टरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणातील पीडित मुलगी अवघी १३ वर्षांची असल्याने घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. अशा परिस्थितीत संबंधित डॉक्टरांनी बेकायदेशीर गर्भपात कसा केला आणि कायद्यानुसार पोलिसांना माहिती का दिली नाही, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही आर्थिक फायद्यासाठी अशा गंभीर गुन्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा असून, यामुळे वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.