कात्रज भागात तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा;आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 17:41 IST2025-10-12T17:41:00+5:302025-10-12T17:41:13+5:30
वादातून विक्रमने सद्दाम याला बेदम मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर त्याने त्याचा मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत टाकून दिला होता.

कात्रज भागात तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा;आरोपी गजाआड
पुणे : कात्रजमधील निंबाळकरवाडी भागात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. सद्दाम उर्फ सलमान शेख (३५, रा. निंबाळरकरवाडी, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी विक्रम चैठा रोतिया (३२, रा. निंबाळरकरवाडी, कात्रज) याला अटक करण्यात आली. सद्दाम आणि विक्रम हे मजुरी करतात. दोघांनी निंबाळकरवाडीत भाड्याने खोली घेतली होती. दोघांमध्ये हातऊसने दिलेल्या पैशांवरून वाद झाले होते. आरोपी सद्दामने विक्रमला मारहाण केली होती. वादातून विक्रमने सद्दाम याला बेदम मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर त्याने त्याचा मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत टाकून दिला होता. शनिवारी दुपारी निंबाळकरवाडीतील मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत सापडल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात बेवारस अवस्थेत सापडलेला मृतदेह सद्दाम याचा असल्याची माहिती मिळाली. वादातून सद्दाम याचा खून त्याच्याबरोबर राहणारा सहकारी विक्रम याने केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक निरीक्षक समीर शेंडे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी आणि तपास पथकाने ही कामगिरी केली.