Crime News: दिवसाढवळ्या ४ लाखांची थरारक चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 16:31 IST2026-04-21T16:30:54+5:302026-04-21T16:31:25+5:30
काही मिनिटांत परत आल्यानंतर त्यांना डिक्की तुटलेली दिसली आणि आत ठेवलेली संपूर्ण रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले.

Crime News: दिवसाढवळ्या ४ लाखांची थरारक चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद
आळेफाटा (पुणे जि) - आळेफाटा (ता. जुन्नर) येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वर्दळीच्या ठिकाणी उभी असलेली दुचाकी लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी डिक्की फोडून तब्बल ४ लाख रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे ही घटना पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ घडल्याने सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव आनंद येथील दत्तात्रय वाघमारे यांनी सकाळी सुमारे ११ वाजता बँकेतून ५ लाख रुपये काढले होते. त्यापैकी १ लाख रुपये सोबत घेऊन ते जवळच असलेल्या पतसंस्थेत गेले, तर उर्वरित ४ लाख रुपये स्कुटीच्या डिक्कीत ठेवले. काही मिनिटांत परत आल्यानंतर त्यांना डिक्की तुटलेली दिसली आणि आत ठेवलेली संपूर्ण रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले.
या घटनेतील महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. प्राथमिक तपासात चोरट्यांनी बँकेपासूनच वाघमारे यांच्यावर नजर ठेवली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.