Pune crime : गुप्तरोगाच्या उपचारासाठी पैसे नव्हते;हडपसर हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवून खंडणी उकळण्याचा कट, आरोपी नागपुरातून अटकेत
By किरण शिंदे | Updated: May 15, 2026 16:38 IST2026-05-15T16:35:01+5:302026-05-15T16:38:43+5:30
Pune crime : आरोपी शिवाजी राठोड हा काही दिवसांपूर्वी हडपसरमधील उषाकिरण रुग्णालयात उपचारासाठी गेला होता.

Pune crime : गुप्तरोगाच्या उपचारासाठी पैसे नव्हते;हडपसर हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवून खंडणी उकळण्याचा कट, आरोपी नागपुरातून अटकेत
पुणे - हडपसर परिसरात उषाकिरण रुग्णालयात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्तरोगाच्या उपचारासाठी तब्बल सात लाख रुपयांची गरज असल्याने आरोपीने रुग्णालयातून पैसे उकळण्यासाठी हा संपूर्ण कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. पुणे पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपी शिवाजी राठोड याला नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. तो कोलकात्याकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली. आरोपी शिवाजी राठोड हा काही दिवसांपूर्वी हडपसरमधील उषाकिरण रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. त्याला गुप्तरोग असल्याचे निदान झाले होते. उपचारासाठी सुमारे सात लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने एवढी मोठी रक्कम उभी करणे त्याला शक्य नव्हते.
याच कारणातून त्याने रुग्णालय व्यवस्थापनाला धमकावून पैसे उकळण्याचा कट आखला. त्यानुसार त्याने रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात टाइमर लावलेली बॉम्बसदृश्य वस्तू ठेवली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तसेच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर रिकामा केला आणि संशयित वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवली.
या घटनेनंतर पुणे पोलिस आणि ATS ने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी शिवाजी राठोड याची ओळख पटवण्यात आली. पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच आरोपीने पुण्यातून पळ काढला होता. तो रेल्वेमार्गे कोलकात्याकडे जाण्याच्या तयारीत असताना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
सध्या आरोपीला पुण्यात आणण्यात येत असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून, रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.