Pune Crime : मध्यरात्री पोलिसांचे ऑपरेशन ‘स्कॉर्पिओ’; येरवड्यात उधळला दारू तस्करीचा डाव
By किरण शिंदे | Updated: April 14, 2026 16:40 IST2026-04-14T16:39:03+5:302026-04-14T16:40:08+5:30
Pune Crime : काळ्या रंगाची स्कॉर्पिओ शहादल बाबा चौकातून नगर रोडच्या दिशेने जाणार असून त्यामध्ये मद्याचा साठा आहे.

Pune Crime : मध्यरात्री पोलिसांचे ऑपरेशन ‘स्कॉर्पिओ’; येरवड्यात उधळला दारू तस्करीचा डाव
पुणे - शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त सुरू असताना लक्ष्मीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत स्कॉर्पिओ गाडीतून विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी रात्री लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील अंमलदार भीमराव कांबळे आणि अमोल वायाळ यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, काळ्या रंगाची स्कॉर्पिओ शहादल बाबा चौकातून नगर रोडच्या दिशेने जाणार असून त्यामध्ये मद्याचा साठा आहे.
या माहितीच्या आधारे रात्रगस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी शहादल बाबा चौकात सापळा रचला. मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित स्कॉर्पिओ (MH14 LP 7474) घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने गाडी अडवून ताब्यात घेतली.
गाडीची झडती घेतली असता डिकीमध्ये विदेशी मद्याच्या बॉक्सचा साठा आढळून आला. पोलिसांनी सुमारे २ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून स्कॉर्पिओ वाहनही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अंग्रेजी सिंग पुरणसिंग गिल (वय ३८, रा. रामनगर, बुद्ध विहाराजवळ, बोपखेल) याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस निरीक्षक उमेश गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय शिंदे, सुरज ओंबासे, अमोल गायकवाड, कादिर शेख आदी कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान, जप्त केलेला मद्यसाठा कुठून आणला गेला आणि तो कुठे नेला जात होता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.