चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:10 IST2026-04-15T12:02:53+5:302026-04-15T12:10:41+5:30
चीनकडे आधीच एक धोरणात्मक पेट्रोलियम साठा आहे जो ३२ सदस्यीय आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या साठ्या एवढाच आहे. तरीही तो तेल खरेदी करत असल्याचा आरोप बेसेंट यांनी केला.

चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
वॉशिंग्टन - इराणकडून तेल खरेदीवर चीनविरोधात अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. चीनइराणकडून तेल खरेदी करू शकणार नाही. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे कुठल्याही चिनी जहाजाला किंवा अन्य जहाजांना स्ट्रेट होर्मुझमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे ते इराणकडून तेल घेऊ शकत नाहीत असा इशारा अमेरिकन अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी दिला आहे.
अमेरिकन अर्थमंत्री स्कॉट बेसेंट म्हणाले की, मध्य पूर्वेतील युद्धांत चीन एक अविश्वासू जागतिक भागीदार राहिला आहे. चीनने तेलसाठा केला आणि काही विशिष्ट वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध घातले असा त्यांनी आरोप केला. हे वर्तन कोविड-१९ महामारीच्या काळात वैद्यकीय पुरवठ्याबाबत चीनने केलेल्या वर्तनासारखेच आहे असंही त्यांनी म्हटलं.
तसेच बेसेंट यांनी इराणसोबतच्या अमेरिका-इस्रायल युद्धावेळी चीनच्या कृतींवर टीका केली. ज्यामुळे तेलाच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली. चीन गेल्या पाच वर्षांत तीन वेळा एक अविश्वासू जागतिक भागीदार असल्याचं सिद्ध झालं आहे. एकदा कोविडच्या काळात जेव्हा त्यांनी वैद्यकीय उत्पादनांचा साठा केला आणि पुन्हा भूगर्भातील खनिजांच्या बाबतीत जेव्हा अमेरिकेने त्यांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची धमकी दिली होती अशीही आठवण करून दिली. इराणने होर्मुझ स्ट्रेट बंद केल्यामुळे जागतिक ऊर्जेची मागणी वाढली. ही मागणी कमी करण्याऐवजी चीनने आता आणखी तेल साठा वाढवण्यावर भर दिला. होर्मुझमधून २० टक्के तेल पुरवठा होतो. चीनकडे आधीच एक धोरणात्मक पेट्रोलियम साठा आहे जो ३२ सदस्यीय आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या साठ्या एवढाच आहे. तरीही तो तेल खरेदी करत असल्याचा आरोप बेसेंट यांनी केला.
दरम्यान, चीन इराणकडून ९० टक्क्याहून अधिक तेल खरेदी करत आहे. जो त्याच्या वार्षिक खरेदीच्या ८ टक्के इतका आहे. या मुद्द्यावर चीनच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मात्र त्यांनी या मुद्द्यावर उत्तर देणे टाळले असंही बेसेंट यांनी सांगितले. आता हा वाद अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मे महिन्याच्या बीजिंग दौऱ्यावर प्रभाव टाकणार का हा प्रश्न उभा राहिला आहे.