मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:09 IST2026-04-15T12:06:31+5:302026-04-15T12:09:30+5:30
दानोळीत २५ लाखाच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यापाऱ्याचा निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Kolhapur Crime: २५ लाख रुपयांची खंडणी मागून अपहरण केलेल्या शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील भाजीपाला व्यापाऱ्याचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. भरतेश्वर राजगोंडा टोपगोंडा (वय ४०) असे मृताचे नाव असून, खूनप्रकरणी दोघांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. राजदीप अजय ताडे (२१), टिल्लू ऊर्फ मंथन राजेंद्र चंदुरे-पवार (२१, दोघे रा. दानोळी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बॅटरीचा करंट देऊन भरतेश्वर यांचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले. या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतेश्वर हे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घरी निघाले होते. याचवेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्याच मोबाइलवरूनच त्यांचे चुलत भाऊ महावीर टोपगोंडा यांना कॉल केला. भरतेश्वर हा फ्लॉवरचे २५ लाख रुपये देणे लागतो असे सांगून त्यांनी पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी महावीर यांनी तुमच्यातील व्यवहार समोर बसून मिटवूया, असे सांगताच संशयितांनी फोन बंद केला. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली होती. यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम राबविली होती.
मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास शेरीमळा रस्त्यावर उसामध्ये भरतेश्वर यांची गाडी आणि चप्पल सापडली. त्यानंतर दुपारी साडेअकराच्या सुमारास त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर व आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, आणखी एका संशयितास ताब्यात घेतले. बॅटरीने करंट देऊन खून झाल्याची प्राथमिक तपासात माहिती समोर आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी दिली. याबाबतची तक्रार शांतीनाथ चवगोंडा टोपगोंडा यांनी दिली.
मोबाइल दुकानदाराचे अपहरण टळले
संशयित आरोपी तीन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे मोबाइल खरेदीसाठी आले होते. मोबाइल घेत असताना दुकानचालकाची गावाकडे येण्या-जाण्याची वेळ त्यांनी माहिती करून घेतली होती. मंगळवारी सकाळी दानोळीत खून झाल्याची घटना उघडकीस आली. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला त्या मोबाइल दुकानदाराचेच अपहरण करायचे होते, असा खुलासा त्यांनी केल्याची माहिती पुढे आली आहे.