चुलत भावाचा खून करण्यासाठी चार लाखांची सुपारी; चौघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 15:25 IST2025-11-30T15:24:34+5:302025-11-30T15:25:48+5:30
खून प्रकरणातील साक्षीदार हा खून प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली.

चुलत भावाचा खून करण्यासाठी चार लाखांची सुपारी; चौघे अटकेत
पुणे : नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या चौकशीत त्याने साथीदारांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे. खून प्रकरणातील साक्षीदार हा खून प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली.
कात्रजमधील गुजरवाडी परिसरात एका नियोजित गृहप्रकल्पाजवळ १७ नोव्हेंबर रोजी अजयकुमार गणेश पंडीत (२२, सध्या रा. साईनगर, खोपडेगनर, कात्रज,मूळ रा. हजारीबाग, झारखंड) याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करुन अजयकुमार याचा चुलतभाऊ अशोक कैलास पंडीत (३५, सध्या रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) याला अटक केली होती. अशोक याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा अजयचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती आरोपी अशोक याला मिळाल्यानंतर त्याने अजयचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानतर पोलिसांनी अशोक चौकशी केली. तेव्हा त्याने खून प्रकरणात आरोपी कृष्णकुमार विजयमहतो वर्मा (२१), सचिनकुमार शंकर पासवान (२६), तसेच खून प्रकरणातील पहिला साक्षीदार रणजीतकुमार धनुखी यादव (३०) हे सामील असल्याची कबुली दिली. अशोक याने चुलतभाऊ अजय याचा खून करण्यासाठी कृष्णकुमार, सचिनकुमार, रणजीतकुमार यांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासात मिळाली. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून आरोपी रेल्वेने झारखंडला पसार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कृष्णकुमार, सचिनकुमार, रणजितकुमार यांना अटक केली.
तिघे आरोपी मूळचे झारखंडचे रहिवासी आहेत. ते कात्रजमधील साईनगर परिसरात नियोजित गृहप्रकल्पात मजुरी करत होते. नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याने अशोक चिडला होता. त्याने चुलतभाऊ अजय याचा खून करण्यासाठी तिघा आरोपींना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक निरीक्षक स्वप्निल पाटील, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलीस कर्मचारी मितेश चोरमले, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सचिन सरपाले, नवनाथ भोसले, सागर बोरगे, महेश बारावकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, निलेश खैरमोेडे, अवधुत जमदाडे, सोनाली पिलणे यांनी ही कारवाई केली.