पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमा मडावी याच्यावर आधारित गाण्यावर नृत्य सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
किरण नारायण गोमासे (वय २२, मूळ रा. देचली, ता. अहेरी, जि. गडचिरोली, सध्या रा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह, विश्रांतवाडी) आणि श्रीनिवास हनुमंत कुमरी (वय २३, मूळ रा. झिंगाणूर, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली, सध्या रा. त्याच वस्तीगृहात) अशी आहेत. दोघेही बीबीएचे शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात ११ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) संघटनेशी संबंधित आणि पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA) चा बटालियन क्रमांक १ चा कमांडर असलेल्या हिडमा मडावी याच्यावर आधारित गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले होते.
या प्रकारामुळे देशाच्या सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडतेला बाधा पोहोचेल अशा प्रकारची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १९७(१)(घ), ३५३(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक भोसले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात या प्रकरणावर चर्चा सुरू झाली आहे.
Web Summary : Pune police booked two BBA students for dancing to a song glorifying Naxalite Hidma during an Ambedkar Jayanti event. The duo is accused of promoting misleading information that threatens national integrity. An investigation is underway.
Web Summary : पुणे पुलिस ने आंबेडकर जयंती कार्यक्रम में नक्सली हिडमा के गाने पर नाचने के आरोप में दो बीबीए छात्रों को गिरफ्तार किया। उन पर राष्ट्रीय अखंडता को खतरे में डालने वाली भ्रामक जानकारी फैलाने का आरोप है। जांच जारी है।