Pune crime:‘गुन्हेगार मोकाट, यंत्रणा झोपेत!’ नसरापूरची चिमुकली ठरली पोलिस-न्यायव्यवस्थेच्या अपयशाची बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 11:20 IST2026-05-03T11:20:03+5:302026-05-03T11:20:31+5:30
या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

Pune crime:‘गुन्हेगार मोकाट, यंत्रणा झोपेत!’ नसरापूरची चिमुकली ठरली पोलिस-न्यायव्यवस्थेच्या अपयशाची बळी
पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे घडलेल्या निर्घृण घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून संतापाची तीव्र लाट उसळली आहे. भीमाजी कांबळे (वय ६५, रा. साळवडे, ता. भोर) या विकृत प्रवृत्तीच्या आरोपीने एका निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला. या घटनेने समाजमन सुन्न झाले असले, तरी त्याहून मोठा धक्का म्हणजे ही दुर्घटना टाळता आली असती, अशी चर्चा आता जोर धरत आहे.
आरोपी भीमाजी कांबळे हा काही पहिल्यांदाच गुन्हा करणारा नव्हता. त्याच्यावर १९९८ आणि २०१५ साली विनयभंग आणि पोक्सोसारखे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. चार वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर तो पुन्हा समाजात मोकाट फिरत होता. एवढ्या गंभीर गुन्ह्यांचा इतिहास असलेल्या व्यक्तीवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात त्याच्यावर कोणतीही ठोस नजर ठेवली गेली नाही. यामुळेच त्याचे मनोबल वाढले आणि त्याने पुन्हा एकदा समाज काळवंडवणारे कृत्य केले.
या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता थेट बोट ठेवले जात आहे. जामिनावर सुटलेल्या अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, वेळोवेळी चौकशी करणे या सर्व गोष्टी केवळ कागदोपत्रीच राहिल्या का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ‘गुन्हेगारांवर पोलिसांचा धाकच राहिला नाही,’ अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
न्यायव्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीला जर कठोर आणि दीर्घकालीन शिक्षा झाली असती, तर तो पुन्हा समाजात येऊन अशा प्रकारचे अमानुष कृत्य करू शकला नसता, अशी भावना व्यक्त होत आहे. जामीन देताना आरोपीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि संभाव्य धोक्याचा पुरेसा विचार झाला का, याचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या घटनेनंतर नसरापूर, भोर तसेच पुणे जिल्ह्यात संतापाचा उद्रेक दिसून आला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी मुंबई-बंगळुरू महामार्गावर मृतदेह आणून रास्ता रोको केला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
ही घटना केवळ एका कुटुंबाचा आक्रोश नाही, तर संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेच्या यंत्रणेवरील तीव्र आरोप आहे. गुन्हेगार मोकाट आणि व्यवस्था निष्क्रिय राहिली, तर अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची हमी कोण देणार? नसरापूरची ही काळी घटना आता एक कठोर प्रश्न विचारत आहे की, ‘यंत्रणा जागी होणार कधी?’