Pune Crime: अपघात की घातपात ? आळंदीत मॉर्निंग वॉकदरम्यान महिलेला टाकीत दिसला मृतदेह; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 13:03 IST2026-04-19T13:02:13+5:302026-04-19T13:03:47+5:30
Pune Crime - फिरत असताना त्यांचे लक्ष केंद्रातील जुन्या पाण्याच्या टाकीकडे गेले. त्यावेळी टाकीत एक व्यक्तीचा मृतदेह दिसताच त्या घाबरल्या आणि त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

Pune Crime: अपघात की घातपात ? आळंदीत मॉर्निंग वॉकदरम्यान महिलेला टाकीत दिसला मृतदेह; परिसरात खळबळ
आळंदी : येथील नगर परिषदेच्या मालकीच्या जुन्या व सध्या बंद अवस्थेत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीत गुरुवारी (दि. १६) सकाळी एका ३६ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सिद्धबेट परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास विशाखा पाटील (रा. डुडुळगाव, ता. हवेली) या नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात गेल्या होत्या. फिरत असताना त्यांचे लक्ष केंद्रातील जुन्या पाण्याच्या टाकीकडे गेले. त्यावेळी टाकीत एक व्यक्तीचा मृतदेह दिसताच त्या घाबरल्या आणि त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने दोरीच्या साह्याने टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक पाहणीत मृत व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी तपासाची दिशा ठरवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख आत्माराम हरिदेव मोरे (वय ३६, रा. औदर, जि. बिदर, कर्नाटक) अशी पटली आहे. ते आळंदी परिसरात कशासाठी आले होते, तसेच त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी पुरावे गोळा केले असून, सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.