२१ लाख घेतले अन् दिल्या खेळण्यातील खोट्या नोटा; पुण्यात सॉफ्टवेअर तरुणीची २१ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 10:41 IST2026-05-12T10:35:34+5:302026-05-12T10:41:56+5:30
Pune Crime - आरोपीला सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक

२१ लाख घेतले अन् दिल्या खेळण्यातील खोट्या नोटा; पुण्यात सॉफ्टवेअर तरुणीची २१ लाखांची फसवणूक
पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एका सॉफ्टवेअर तरुणीची लग्नाचे आमिष दाखवून एकाने २१ लाखांची फसवणूक केली. आरोपीने तरुणीला २१ लाखांच्या बदल्यात ५० लाखांच्या खेळण्यातील खोट्या नोटा दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गोरखनाथ भाऊ गावंडकर (वय ४१, रा. कडसुरे,ता. रोहा, जि. रायगड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत नांदेड सिटी येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च २०२५ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने एका विवाह विषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यातून गोरखनाथ गावंडकर याच्याशी ओळख झाली. गोरखनाथ गावंडकर याचे पालघर येथे रेस्टॉरंट, बार आहे. ही तरुणी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तिच्या भावाचा छत्रपती संभाजीनगर येथे व्यवसाय आहे.
त्याच्याशीही गोरखनाथ याची ओळख झाली. त्यांच्या भेटीगाठी झाल्या. दरम्यान, एका दिवशी गोरखनाथ याने या तरूणीकडे १ लाख रुपये मागितले. तिने पैसे दिले. त्याने ४ दिवसांनी पैसे परत केले. त्यामुळे त्यांचा गोरखनाथवर विश्वास बसला. त्याने तरुणीला आपण लग्न करुया, असे आमिष दाखवले होते. नव्या कामामधून पैसे मिळणार आहेत, त्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे, असे सांगत त्याने तरूणीकडून २१ लाख रुपये घेतले. काही दिवसांनी या तरुणीने पैशांचे काय झाले, कधी परत करणार अशी विचारणा केली. तेव्हा त्याने सिंहगड रोड येथील अतिथी हॉटेलमध्ये तिला फोन करुन बोलवले. तिला काळ्या रंगाची लेदरची बॅग दिली. यामध्ये ५० लाख रुपये आहेत.
त्यातून तुझे २१ लाख घे, उरलेले पैसे मला आरटीजीएस कर, असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर या तरुणीने बॅगेची पाहणी केली असता बॅगेमध्ये लहान मुलांच्या खेळण्यामधील नोटा असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या तरुणीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गोरखनाथ गावंडकर याची आई पुण्यात राहते. तो तिच्या घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर कदम करत आहेत.