प्राध्यापक भरतीवरून विद्यापीठात झडताहेत आराेप-प्रत्याराेपांच्या फैरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 09:58 IST2026-05-12T09:58:27+5:302026-05-12T09:58:59+5:30
सदर खोट्या व बदनामीकारक वृत्तांकनामुळे व त्याच्या प्रसारणामुळे विद्यापीठाची प्रतिमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाहक मलिन होत आहे.

प्राध्यापक भरतीवरून विद्यापीठात झडताहेत आराेप-प्रत्याराेपांच्या फैरी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक भरतीमध्ये कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या मथळ्याखाली एका वाहिनीने वृत्त प्रसारित केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पत्रक काढून हे वृत्त खाेटे असल्याचे नमूद केले. त्याचबराेबर विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधीने चुकीची माहिती पसरवल्याचा ठपला ठेवला. दुसरीकडे संशाेधक विद्यार्थ्यानेही या प्रकरणाचा खुलासा करत नाहक बदनामी केल्याचे सांगून विद्यापीठ प्रशासनावरच ॲट्राॅसिटीचा गुन्हा नाेंदवण्याची मागणी केली आहे.
विद्यापीठ प्रशासनाच्या मते, ‘पुणे विद्यापीठात प्राध्यापक व्हायचंय मग १ कोटी रुपये तयार ठेवा’ या मथळ्याखाली वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध केलेले वृत्तांकन निखालस खोटे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १११ शिक्षकी पदांच्या भरतीप्रक्रियेत महाघोटाळा झाला असून सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी रुपये १ कोटीची लाच मागितली जात असल्याचे खोटे कथन करण्यात आले आहे.
विद्यापीठाची हेतुपुरस्सर बदनामी करणारे हे वृत्तांकन आहे. सदर खोट्या व बदनामीकारक वृत्तांकनामुळे व त्याच्या प्रसारणामुळे विद्यापीठाची प्रतिमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाहक मलिन होत आहे. सदर आरोपांचे जाहीर खंडन विद्यापीठ प्रशासन करत असून अशा प्रकारे विद्यापीठाची प्रतिमा नाहक मलिन करणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र निषेध करत आहे. सदर भरती प्रक्रियेमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांनी व इतर समाजघटकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘एटीआर’ आणि ‘एपीआय’च्या नावाखाली नऊ हजारांपैकी सहा हजार उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद केले आहे. त्याविरोधात आवाज उठवल्याचा राग मनात धरून विद्यापीठ प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. प्राध्यापक पदभरती पारदर्शक व्हावी, ही मागणी करणे गुन्हा आहे का? हजारो पात्र दलित बहुजन उमेदवारांना ‘एटीआर’च्या नावाखाली बाद केले? याविरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे का? थोडक्यात प्रश्न विचारले म्हणून माझा रोहित वेमुला करण्याचे षडयंत्र विद्यापीठ प्रशासनाने रचले आहे. हा प्रकार ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा आहे. विद्यापीठ प्रशासनाने संबंधित प्रकटन मागे घेऊन खुलासा केला नाही तर कुलगुरू, प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, कायदेशीर सल्लागार आणि सहायक कुलसचिव जनसंपर्क विभाग यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीअंतर्गत तक्रार देणार आहे. - राहुल ससाणे, विद्यार्थी प्रतिनिधी