पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 00:40 IST2026-04-29T00:39:42+5:302026-04-29T00:40:31+5:30
मागील दोन वर्षांत अमितेश कुमार यांनी जवळपास ३०० पिस्तूल परवाने रद्द केले आहेत...

पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द
शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पुणेपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एकाच दिवशी तब्बल ४० जणांचे पिस्तूल परवाने रद्द केले आहेत. पोलिस आयुक्तालयाने केलेल्या सखोल छाननीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यामध्ये वेळेत पिस्तूल परवाना नोंदणी न करणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणे, तक्रारी किंवा वादांमध्ये नाव असणे, पिस्तूल परवाना ठेवण्याची वास्तविक गरज नसणे या सर्व बाबींचा विचार करून संबंधित परवान्यांवर ‘कात्री’ लावण्यात आली.
मागील दोन वर्षांत अमितेश कुमार यांनी जवळपास ३०० पिस्तूल परवाने रद्द केले आहेत. नव्या परवान्यांवरही मोठ्या प्रमाणात निर्बंध आणण्यात आले आहेत. सध्याच्या धोरणानुसार अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच परवाना, प्रामुख्याने क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना प्राधान्य, प्रत्यक्ष जीवितास धोका असल्याचे पुरावे असतील तरच परवाना दिला जाणार आहे.
शस्त्र गरज म्हणून पाहिजे, तर ती गरज सिद्ध झाली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक अर्जाची काटेकोर पडताळणी केली जाईल, आणि त्यानंतरच शस्त्र परवाना दिला जाईल असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.