आळंदीत वाहतूक कोंडीने घेतला माजी जवानाचा बळी;वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 17:06 IST2026-05-01T17:05:50+5:302026-05-01T17:06:11+5:30

- या घटनेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Pimpri Chinchwad traffic jam in Alandi claimed the life of a former soldier; tragic end due to lack of timely treatment | आळंदीत वाहतूक कोंडीने घेतला माजी जवानाचा बळी;वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी अंत

आळंदीत वाहतूक कोंडीने घेतला माजी जवानाचा बळी;वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी अंत

आळंदी : देशाच्या सीमेवर २२ वर्षे केंद्रीय राखीव पोलिस दलात सेवा बजावलेले माजी जवान भिमाजी तुकाराम चौरें (वय ५९) यांचा आळंदीतील वाहतूक कोंडीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पद्मावती रोडवरील जगन्नाथ पार्क येथे वास्तव्यास असलेल्या चौरें यांना घरी असताना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जवळील के.के. हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. घरापासून रुग्णालयाचे अंतर अवघे एक किलोमीटर असतानाही, त्या दिवशी पद्मावती रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी होती.

परिसरातील अनेक मंगल कार्यालयामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. चारचाकी वाहनातून पुढे जाणे अशक्य झाल्याने कुटुंबीयांनी वाहन रस्त्याच्या कडेला सोडून रिक्षाचा पर्याय निवडला. मात्र, परिस्थिती इतकी बिकट होती की, रिक्षाला मार्ग मिळावा म्हणून चौरें यांची पत्नी व मुलगी रस्त्यावर धावत सुटल्या. वाहनचालकांना विनवण्या करत त्यांनी रस्ता मोकळा करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

तरीही अवघ्या एका किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे २० मिनिटांचा वेळ लागला. रुग्णालयात पोहोचेपर्यंत उशीर झाल्याने चौरें यांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेमुळे आळंदीतील वाहतूक व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. पद्मावती रोडवरील वाढत्या मंगल कार्यालयांकडे पार्किंगची अपुरी सोय असल्याने वाहनचालक रस्त्यावरच गाड्या उभ्या करतात. त्यामुळे येथे नेहमीच कोंडीची समस्या निर्माण होत असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेलाही मार्ग मिळणे कठीण झाले आहे.

नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर टीका करत अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मंगल कार्यालयांवर निर्बंध लावणे, पार्किंगची सक्ती करणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title : आळंदी में ट्रैफिक जाम ने ली पूर्व सैनिक की जान; इलाज में देरी घातक।

Web Summary : आळंदी में ट्रैफिक जाम के कारण पूर्व सैनिक भीमाजी चौरे की हृदय गति रुकने के बाद इलाज में देरी से मौत हो गई। अस्पताल के करीब रहने के बावजूद, शादी के हॉल के पास भीड़भाड़ के कारण 20 मिनट की देरी हुई। खराब यातायात प्रबंधन पर जनता का आक्रोश बढ़ रहा है।

Web Title : Traffic jam in Alandi claims ex-soldier's life; delayed treatment fatal.

Web Summary : Ex-soldier Bhimaji Chaure died in Alandi due to a traffic jam delaying his treatment after a heart attack. Despite living close to the hospital, congestion near wedding halls caused a critical 20-minute delay. Public outrage is growing over the poor traffic management.