PIFF: पिफचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘द एलिशियन फील्ड', तर 'बाप्या’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:24 IST2026-01-23T13:23:39+5:302026-01-23T13:24:22+5:30

‘बाप्या’मधील भूमिकेसाठी गिरीश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि राजश्री देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

PIFF's Best International Film 'The Elysian Fields', while 'Bapya' won the Best Marathi Film award | PIFF: पिफचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘द एलिशियन फील्ड', तर 'बाप्या’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार

PIFF: पिफचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘द एलिशियन फील्ड', तर 'बाप्या’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार

पुणे : पुणेआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (पिफ) मध्ये शासनाचा ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ प्रदीप कुरबाह दिग्दर्शित 'द एलिशियन फील्ड' या चित्रपटाला, तर शासनाचा ‘संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार’ समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला.

पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या वतीने २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात महाराष्ट्र चित्रपट आणि सांस्कृतिक रंगभूमी विकास प्राधिकरणाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर आणि आंतरराष्ट्रीय ज्यूरी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी ‘लॉस्ट लँड’ विशेष उल्लेखनीय चित्रपट ठरला. गोंधळ चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ‘बाप्या’मधील भूमिकेसाठी गिरीश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि राजश्री देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल विश्वजित, ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल आणि आशा काळे यांना ‘पिफ डिस्टिंग्विश अॅवार्ड’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ व्हायोलिनवादक आणि संगीतकार अमर हलदीपूर यांना संगीतकार एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, महाराष्ट्र चित्रपट आणि सांस्कृतिक रंगभूमी विकास प्राधिकरणाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर, महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.

‘मी बंगाली चित्रपटातून पुढे आलो. गुरुदत्त यांनी मला हिंदी चित्रपटात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळेच मी मुंबईत आलो,’ अशी आठवण ज्येष्ठ अभिनेते विश्वजित यांनी गुरुवारी सांगितली. ‘ये नयन डरे डरे’ हे कोहरा चित्रपटातील स्वत:वर चित्रित झालेले गाणे सादर करून रसिकांची मने जिंकली.

‘रसिकांच्या प्रेमाची किंमत करता येत नाही, इतके ते अमूल्य आहे,’ अशी भावना जलाल यांनी व्यक्त केली. ‘रंगमंचावर आणि चित्रपटात केलेल्या कामाला रसिकांनी भरभरून प्रेम दिले. त्या जोरावरच हा प्रवास झाला,’ असे काळे यांनी सांगितले. ‘एक व्यक्ती गाणे घडवत नाही. तो अनेकांचा प्रयत्न असतो. त्या सर्वांनी मला घडवले आहे,’ असे हलदीपूर यांनी सांगितले. निकिता मोघे यांच्या संस्थेतर्फे हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांवर आधारित नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. अभिनेत्री श्रीया बुगडे आणि अभिनेते क्षितिज दाते यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title : पीआईएफएफ पुरस्कार: 'द एलिशियन फील्ड' सर्वश्रेष्ठ फिल्म; 'बाप्या' सर्वश्रेष्ठ मराठी

Web Summary : पुणे अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सव में 'द एलिशियन फील्ड' और 'बाप्या' सम्मानित। संतोष डावखर सर्वश्रेष्ठ निर्देशक, गिरीश कुलकर्णी सर्वश्रेष्ठ अभिनेता, और राजश्री देशपांडे सर्वश्रेष्ठ अभिनेत्री बने। अनुभवी कलाकार विश्वजीत, फरीदा जलाल, आशा काले और अमर हलदीपूर भी सम्मानित।

Web Title : PIFF Awards: 'The Elysian Field' Best Film; 'Bapya' Best Marathi

Web Summary : Pune International Film Festival honored 'The Elysian Field' and 'Bapya'. Santosh Dawkhar won Best Director, Girish Kulkarni Best Actor, and Rajshree Deshpande Best Actress. Veteran artists Vishwajeet, Farida Jalal, Asha Kale, and Amar Haldeepur were also felicitated for their contributions.