Summer Vacation: उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक मुलांसाठी निवडतात ‘डिजिटल डिटॉक्स’चा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:26 IST2025-05-15T15:24:51+5:302025-05-15T15:26:12+5:30
पुस्तक वाचन, हस्तकला, संगीत, नृत्य, योगा, शास्त्रीय वाद्य, जलतरण, स्केटिंग यांसारख्या उपयुक्त वर्गांमध्ये मुलांचा वेळ घालवण्यावर पालकांकडून भर दिला जात आहे

Summer Vacation: उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक मुलांसाठी निवडतात ‘डिजिटल डिटॉक्स’चा पर्याय
उजमा शेख
पुणे : उन्हाळा सुरू झाला की, मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं; पण त्याच वेळी पालकांच्या मनात अनेक योजना आकार घेतात. आजची पालक मंडळी केवळ सुट्टीचा अर्थ मजा-मस्ती असा न ठेवता, त्याचा उपयोग विकासासाठी कसा करता येईल यावर भर देताना दिसतात. आजच्या डिजिटल युगात मुलांचा जास्त वेळ मोबाइल, गेम्स आणि सोशल मीडिया यामध्ये जातो. त्यामुळे अनेक पालक आता ‘डिजिटल डिटॉक्स’चा पर्याय स्वीकारत आहेत.
‘डिजिटल डिटॉक्स’मध्ये पुस्तक वाचन, हस्तकला, बागकाम, भांड्यांची सजावट, कथा-कविता लेखन, मुलांना कला, संगीत, नृत्य, योगा, शास्त्रीय वाद्य, जलतरण, स्केटिंग, कम्प्युटर कोर्स, रोबोटिक्स, कोडिंग यांसारख्या उपयुक्त वर्गांमध्ये मुलांचा वेळ घालवण्यावर पालकांकडून भर दिला जात आहे. पुण्यातील अनेक संस्थांनीही यंदा विशेष उन्हाळी कार्यशाळा, वाचन शिबिरे, संवाद शिबिरे आणि विज्ञान प्रयोगशाळा आयोजित केल्या आहेत. या माध्यमातून मुले केवळ शिक्षणाशी जोडली जातातच; पण त्यांच्यातील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि संघभावनाही वाढते. अनेक संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या उन्हाळी शिबिरांमध्ये मुलांना स्वतंत्रपणे राहणं, गटात काम करणं, वेळेचं नियोजन करणं, समस्या सोडवणे अशा गोष्टी शिकवल्या जात आहेत.
सुट्टीत मुलांना काहीतरी नवीन शिकावं असं वाटतं. म्हणूनच आम्ही आमच्या मुलाला विज्ञान शिबिरात घातलं आहे. तिथं तो प्रयोग शिकतो, निरीक्षण करतो, आणि खूप उत्साहाने अनुभव सांगतो. - मोनिका ओंबळे (पालक)
मोबाइल आणि सोशल मीडियापेक्षा मुलांच्या मनात कल्पनाशक्ती, कुतूहल आणि सर्जनशीलतेचं बीज पेरणं हीच सुट्टीची खरी शिदोरी असते. त्यामुळे ‘डिजिटल डिटॉक्स’मुळे मुले त्यांच्या बालपणाशी पुन्हा जोडले जातात. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही नोकरी करत असल्यामुळे मुलांना वेळ देता येत नाही; पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही एकत्र छोटी ट्रिप प्लॅन करतो.- अवधूत सूर्यवंशी (पालक)