School: एकच शिक्षक! ग्रामस्थ संतप्त; शिरूर तालुक्यात पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:02 IST2025-06-16T15:02:09+5:302025-06-16T15:02:51+5:30
जो पर्यंत शिक्षक मिळत नाही तो पर्यंत शाळा सुरु करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली

School: एकच शिक्षक! ग्रामस्थ संतप्त; शिरूर तालुक्यात पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप
शिरूर : आज राज्यात सर्वत्र शाळा सुरु होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विदयार्थ्यांचे स्वागत केले जात असताना शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे मात्र शिक्षक मिळत नसल्याने पहिल्याच दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. आज सकाळी दहा वाजता शाळा भरण्यापूर्वी एकत्र येत संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. व घोषणाबाजी करत शिक्षण विभागाचा निषेध नोंदवला. जो पर्यंत शिक्षक मिळत नाही तो पर्यंत शाळा सुरु करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
कोळगाव डोळस येथे काही महिन्यापूर्वी विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याने बाळु गुंजाळ या शिक्षकाचे शिक्षण विभागाने निलंबन केले होते. यामुळे येथे एकमेव शिक्षक चार वर्गांना शिकवत आहेत. ग्रामस्थांनी लेखी निवेदन देत वारंवार शिक्षक देण्याची मागणी करूनही शिक्षण विभागाने येथे नवीन शिक्षक नेमला नाही. गेली पाच ते सहा महिण्यापासून या शाळेत एकच शिक्षक शिकवण्याचे काम करत आहे. या शाळेत ५० पेक्षा अधिक पटसंख्या एकच शिक्षक असल्याने विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी अनेक पालकांनी आपली मुले इतर शाळेत पाठवण्यास सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन तसेच तोंडी मागणी केली आहे.परंतु याकडे शिक्षण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आज शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी विद्यार्थनाचे स्वागत बाजूला ठेवून शाळेला कुलूप ठोकले.
यावेळी उपसरपंच सिद्धार्थ डोळस, राष्ट्रवादीचे सरचिटणीस विलास जगताप, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जगताप, माजी सरपंच सोमनाथ सूर्यवंशी, सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष बाबू गोरे,नारायण शेडगे, प्रकाश वाळुंज, संभाजी कुल, आबासाहेब नागवडे, यशवंत पडवळ, प्रकाश पडवळ, अर्जुन सूर्यवंशी, प्रमोद धामोरे, शंकर कोळपे, उमेश सूर्यवंशी, बाळासाहेब धुमाळ आदी उपस्थित होते.
गेल्या सहा महिन्यापासून शिक्षक मागणीची वेळोवेळी निवेदने देऊनही शिक्षणाधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे अखेरीस शाळेला कुलूप ठोकण्याची वेळ आली आहे. - कैलास सूर्यवंशी, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती
ग्रामस्थांच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर केंद्रप्रमुखांना संबंधित शाळेवर पाठवले आहे. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करुन शाळेला एक शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार: आहे. ग्रामस्थांनी सहकार्य करावे. - बाळकृष्ण कळमकर , गटशिक्षणाधिकारी शिरूर