पुणे : नीट-यूजी पेपरफुटीची गांभीर्याने दखल घेत ‘सीबीआय’ने धडक कारवाई सुरू केली आहे. यात ‘सीबीआय’ने पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या वरिष्ठ वनस्पतिशास्त्र शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला दिल्ली येथून अटक केली आहे. यावरून पेपरफुटीचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. जीवशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका लीक करण्यात मांढरे ही एक सूत्रधार असल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. संस्काराचे धडे देणाऱ्यांचेच हात काळे झाल्याचे दिसून येत आहे. विद्येच्या माहेरघरात सुरू असलेला हा कारभार पुणेकरांना शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे. माॅडर्न महाविद्यालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अंतर्गत समिती नेमवून चाैकशी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने तज्ज्ञ म्हणून मनीषा मांढरे हिची नियुक्त केली होती. त्यामुळे नीट-यूजी २०२६ परीक्षा प्रक्रियेत तिचा सहभाग होता. वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकेसाठी पूर्ण प्रवेश होता. तिने एप्रिल २०२६ मध्ये पुण्यातील मनीषा वाघमारे हिच्या माध्यमातून संभाव्य नीट परीक्षार्थींना एकत्र केले आणि पुण्यातील निवासस्थानी विशेष कोचिंग वर्ग घेतले. या वर्गांमध्ये तिने वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांतील विविध प्रश्न समजावून सांगितले, तसेच ते विद्यार्थ्यांना त्यांच्या वह्यांमध्ये लिहून घेण्यास आणि पाठ्यपुस्तकांमध्ये मार्क करण्यास सांगितले हाेते. सदर प्रश्नांपैकी बहुतेक प्रश्न ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळले आहेत.
यातील मनीषा वाघमारे हिला तीन दिवसांपूर्वीच अर्थात १४ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. ‘सीबीआय’ने अवघ्या २४ तासांत देशभरातील ६ ठिकाणी छापे टाकत अनेक महत्त्वाचे दस्तऐवज, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाइल फोन जप्त केले आहेत. सदर वस्तूंचे सविस्तर विश्लेषण सुरू आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी ५ आरोपींना न्यायालयात हजर करून सविस्तर चौकशीसाठी ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली. इतर २ आरोपींना पुणे न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला हलवण्यात आले असून, त्यांना दिल्ली न्यायालयात हजर केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आजच्या स्पर्धेच्या काळात सर्व काही पैशांनी विकत घेता येते. कुठल्याही अनैतिक मार्गाचा वापर केला तरी चालतो, असा समज दृढ हाेत आहे. यापासून पालक-विद्यार्थी अलिप्त कसे राहतील? यात विद्यार्थ्यांनी मार्क वाढवून घेण्यासाठी आणि क्लासचालक प्रसिद्धी, आर्थिक फायद्यासाठी नीतिमत्ता पायदळी तुडवत आहेत. प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी हा मोठा मानसिक धक्का आहे. यात पैसा आणि सत्तेचा वापर उघडपणे हाेत असल्याचे दिसत आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि न्याय्य परीक्षा पद्धत राबविता येत नाही, हे सरकारचे अपयश आहे. - मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी
शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या सहकार्याने पुण्यात ‘कॉलेज - क्लास इंटिग्रेटेड’ धाेरण सर्रास राबविले जात आहे. परिणामी मागील दोन-तीन वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालये नावाला उरले असून, पालक-विद्यार्थ्यांचा ओढा खासगी क्लासेसकडे आहे. नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर तरी शिक्षण विभागाने धडक मोहीम राबवून ‘काॅलेज-क्लास इंटिग्रेटेड’चे जाळे उखडून टाकावे; अन्यथा आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदाेलन करू. - कल्पेश यादव, युवासेना
शिवाजीनगर येथील मॉडर्न कला-विज्ञान-वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) येथील कनिष्ठ विभागातील शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे या गेली २४ वर्षे संस्थेत इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयाचे अध्यापन करीत आहेत. अध्यापनातील हाच अनुभव लक्षात घेऊन ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (एनटीए) ने काही गोपनीय कामकाजासाठी त्यांची नियुक्ती केली होती. सदर कार्य पूर्णतः गोपनीय असल्याने संबंधित व्यक्ती आणि एनटीए यांच्यामधील पत्रव्यवहार व सूचनांची देवाणघेवाण थेट त्या स्तरावर होत असते. या प्रक्रियेशी महाविद्यालय प्रशासन अथवा संस्थेचा कोणताही प्रत्यक्ष संबंध नाही. मनीषा मांढरे यांना नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाली आहे. या प्रकरणाची संस्था व महाविद्यालय स्तरावर गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (मेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित शिक्षिकेविरूद्ध आवश्यक ती चौकशी करून नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. - प्रा. शामकांत देशमुख, कार्यवाह, प्राे. ए. साेसायटी
Web Summary : NEET paper leak: CBI arrests Pune teacher Manisha Mandhare from Delhi. She allegedly leaked the paper, running coaching classes. College promises investigation. Nine arrested so far.
Web Summary : नीट पेपर लीक: सीबीआई ने पुणे की शिक्षिका मनीषा मांढरे को दिल्ली से गिरफ्तार किया। कथित तौर पर पेपर लीक किया, कोचिंग कक्षाएं चलाईं। कॉलेज ने जांच का वादा किया। अब तक नौ गिरफ्तार।