Rahul Gandhi On Neet Exam 2026 Paper Leak Case: नीट परीक्षेसाठी दोन वर्षांत २२ लाख विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. दिवस रात्र अभ्यास केला. पण हे सगळे फुकट गेले. संपूर्ण देशाला आता माहिती झाले आहे की, परीक्षेच्या दोन दिवस आधी व्हॉट्सअॅपवर नीट परीक्षेचा पेपर शेअर केला जात होता. पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ आदेश द्यायला हवेत की, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. त्यांना बडतर्फ करण्यात यावे आणि या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांना पकडून जेलमध्ये टाकायला हवे, अशी मागणी काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
नीट परीक्षा रद्द झाल्यापासून देशभरात अनेक ठिकाणी पेपर लीक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अटकसत्र सुरू आहे. महाराष्ट्रातील लातूर, पुणे येथूनही काही महत्त्वाच्या संशयितांना अटक करण्यात आली आहे. यावरून विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधी यांनी नीट परीक्षा रद्द होणे, पेपर लीक होणे यावरून सरकारवर टीका केली. तसेच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले. एक्सवरील आपल्या व्हिडिओत राहुल गांधी म्हणतात की, देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे म्हणणे आहे की, या प्रकाराशी माझा काही संबंध नाही. समितीने त्यांना काही शिफारसी केल्या होत्या. परंतु, त्याला त्यांनी केराची टोपली दाखवली. विरोधक या समितीत आहेत, त्यांच्या शिफारसी दखल घेण्यासारख्या नाहीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
भाजपा, संघाने देशाची शिक्षण व्यवस्था संपवून टाकली
सत्य हे आहे की, मुख्य गाभा आहे, त्याला आपण धक्का लावला आहे. ही एक टोळी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), भाजपा आणि विद्यापीठांमध्ये यांचे जे कुलगुरू बसवले आहेत, प्रोफेसर बसवले गेले आहेत, त्यांचा पैसे कमावण्याचा हा गट आहे. या गटानेच देशाची शिक्षण व्यवस्था संपवून टाकली आहे, असा मोठा आणि गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच २२ लाख विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. तरी, मोदी चकार शब्दही काढत नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवा, नाहीतर स्वतः जबाबदारी घ्या, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सगळ्या देशाला माहिती आहे की, तुम्हाला कुलगुरू व्हायचे असेल, तर अनुभव आणि शिक्षण यांच्या काहीही आवश्यकता नाही. जर तुम्ही संघाच्या विचारांचे असेल, तर तुम्ही त्या पदापर्यंत जाऊ शकता. पण जर तुमची विचारधारा संघाची नसेल, तर तुम्ही त्या पदावर बसू शकत नाही. हेच कारण आहे, ज्यामुळे देशात ८० वेळा पेपर लीक झाला आहे आणि २ कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य बरबाद झाले आहे, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला.
Web Summary : Rahul Gandhi demands Education Minister Dharmendra Pradhan's removal over the NEET paper leak, linking the scandal to the RSS and BJP. He alleges a systemic corruption within the education system, accusing them of prioritizing ideology over merit, jeopardizing students' futures.
Web Summary : राहुल गांधी ने नीट पेपर लीक मामले में शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त करने की मांग की और घोटाले को आरएसएस और भाजपा से जोड़ा। उन्होंने शिक्षा प्रणाली के भीतर एक व्यवस्थित भ्रष्टाचार का आरोप लगाया, उन पर योग्यता से ऊपर विचारधारा को प्राथमिकता देने और छात्रों के भविष्य को खतरे में डालने का आरोप लगाया।