पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर मध्यरात्री चोरी; क्रॉसवर्ड बुक स्टोअरचे शटर उचकटून चोरट्यांनी मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:45 IST2025-12-06T12:45:01+5:302025-12-06T12:45:36+5:30
दुकानाच्या मुख्य दरवाजावरील लॉक उचकटून चोरट्यांनी काऊंटरमध्ये ठेवलेली अंदाजे दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर मध्यरात्री चोरी; क्रॉसवर्ड बुक स्टोअरचे शटर उचकटून चोरट्यांनी मारला डल्ला
किरण शिंदे
पुणे: पुण्यात मागील काही दिवसांपासून स्ट्रीट क्राईमचे प्रकार वाढले आहेत. वाढत्या गुन्हेगारीने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनाची तोडफोड, कोयता गँगचा धुमाकूळ यासारख्या घटना सुरू असताना आता चोरीच्या गुन्ह्यांमध्येही वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. ५ डिसेंबरच्या मध्यरात्री फर्ग्युसन रस्त्यावर घडलेली चोरीची घटना घडली आहे. वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या माहितीनुसार, पाच डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध क्रॉसवर्ड बुक स्टोअरला लक्ष्य केलं. दुकानाच्या मुख्य दरवाजावरील लॉक उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि आपला मोर्चा सरळ कॅश काऊंटरकडे वळवला. काऊंटरमध्ये ठेवलेली अंदाजे दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
घटना घडल्यानंतरच्या सकाळी दुकानातील कर्मचारी कामावर येताच हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला. कॅश काऊंटर अस्ताव्यस्त, दुकानाचे शटर उचकटलेले पाहून त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दुकानातील कर्मचारी उमाशंकर रामलोट गुप्ता (वय ३७) यांनी डेक्कन पोलिसांना चोरी झाल्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात दोन अज्ञात इसमांनी ही चोरी केल्याचं समोर आलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयितांची ओळख पटवण्याचे काम डेक्कन पोलिस करत आहेत.