विवाहितेचे वडिलांकडून अपहरण; जबरदस्तीने दुसरे लग्न लावण्याच्या उद्देशाने धक्कादायक प्रकार, ४ आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 15:50 IST2026-05-07T15:43:32+5:302026-05-07T15:50:39+5:30
विवाहित महिला त्यांच्या सासरच्या व्यक्तीसोबत असताना, महिलेच्या वडिलांसह अन्य सहा जणांनी त्यांना अडवून अपहरण केले

विवाहितेचे वडिलांकडून अपहरण; जबरदस्तीने दुसरे लग्न लावण्याच्या उद्देशाने धक्कादायक प्रकार, ४ आरोपी जेरबंद
निरगुडसर: आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, विवाहित मुलीचे तिच्याच वडिलांनी साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारगाव कारखाना पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या चार तासांत सात आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली.
ही घटना ४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सौ. साक्षी विशाल भागवत (रा. पारगाव, लबडे मळा, ता. आंबेगाव, जि. पुणे) या त्यांच्या सासरच्या व्यक्तीसोबत असताना, त्यांच्या वडिलांसह अन्य सहा जणांनी त्यांना अडवले. आरोपींनी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करत जबरदस्तीने वाहनात टाकून त्यांचे अपहरण केले. प्राथमिक तपासात या अपहरणामागील उद्देश पीडितेचे जबरदस्तीने दुसरे लग्न लावून देण्याचा असल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ हालचाल सुरू केली. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत पोलिसांनी अवघ्या चार तासांत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. या प्रकरणी शिवाजी भाऊ खाटेकर (वय ४५, रा. पारगाव, ता. आंबेगाव), अमोल चांगदेव रोडे (वय ३३), सचिन रावसाहेब रोडे (वय २९), अक्षय विश्वनाथ वाडगे (वय २९), अभिजीत बारकू रोडे (वय २६), नंदकिशोर विलास तितर (वय ३२, सर्व रा. नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) तसेच जयश्री अशोक कुदनर (वय ३५, रा. साकोर, ता. संगमनेर, जि. अहील्यानगर) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.