Lokmat Maha Games 2026: महाराष्ट्राला मिळाले नवे चॅम्पियन्स; सायना नेहवालकडून सुवर्ण विजेत्यांना कौतुकाची थाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:16 IST2026-01-12T17:15:49+5:302026-01-12T17:16:15+5:30
Lokmat Maha Games 2026 सायनाने बॅडमिंटनमधील सुवर्णपदक विजेत्या चार खेळाडूंना आपल्यासोबत बॅडमिंटन खेळण्याची स्वप्नवत संधी दिली

Lokmat Maha Games 2026: महाराष्ट्राला मिळाले नवे चॅम्पियन्स; सायना नेहवालकडून सुवर्ण विजेत्यांना कौतुकाची थाप
पुणे : ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू, पद्मभूषण सायना नेहवालकडून पदक आणि कौतुकाची थाप मिळाल्यानंतर झालेला आनंद आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा चैतन्यमयी वातावरणात शुक्रवारी (दि. ९) ‘लोकमत महागेम्स’चा भव्यदिव्य, दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळ पुण्यात पार पडला.
लोकमत कॅम्पस क्लब आयोजित आणि अभय भुतडा फाउंडेशन प्रस्तुत लोकमत महागेम्सचे पारितोषिक वितरण पुण्यात झाले. यावेळी लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, लोकमत कॅम्पस क्लबच्या संचालिका रुचिरा दर्डा, अभय भुतडा फाउंडेशनच्या सहसंस्थापिका तृप्ती अभय भुतडा उपस्थित होत्या. यावेळी तब्बल १२४ जणांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यभरातून या समारंभासाठी पुण्यात आलेल्या पालक, मुलांनी रिट्झ कार्लटन येथे भव्यदिव्य सोहळा अनुभवला. प्रत्येकाला सायना नेहवालला पाहण्याची, तिला भेटण्याची उत्सुकता होती. सायनानेही सर्व पदक विजेत्यांना कौतुकाची थाप देत सर्वांची मने जिंकली. डाॅ. विजय दर्डा आणि रुचिरा दर्डा यांनी सायनाशी संवाद साधताना तिचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास उलगडला. सायनाने कष्ट, जिद्द, चिकाटी असल्यास यश मिळवणे शक्य असल्याचे यावेळी सांगितले.

सायनाही झाली थक्क
सायनाने बॅडमिंटनमधील सुवर्णपदक विजेत्या चार खेळाडूंना आपल्यासोबत बॅडमिंटन खेळण्याची स्वप्नवत संधी दिली. चिमुकल्यांच्या रॅली पाहून सायनाही थक्क झाली.
अशी मिळाली बक्षीसे
पाच लाख : इरा ग्लोबल स्कूल, डोंबिवली.
तीन लाख :श्री शारदा आदिवासी आश्रम शाळा, नांदेड
दाेन लाख : सनग्रेस हायस्कूल, पुणे
खेळात कष्ट, शिस्तीला पर्याय नाही : सायना
सायना नेहवालने मुलांशी संवाद साधताना सांगितले की, खेळात किंवा कोणत्याही क्षेत्रात नाव मोठे करायचे असेल तर शिस्तीला पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ला शिस्त लावून सराव, मेहनत घेण्यावर भर दिला पाहिजे. पालकांनी मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
भविष्यातील अनेक स्टार खेळाडू मला या मुलांमध्ये दिसत आहेत. लोकमतकडून नेहमीच खेळ आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यात येतो. लोकमत महागेम्समुळे आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अनेकजण खेळाला पाठिंबा देतात; पण खेळात राजकारण करता कामा नये. खेळाला राजकारणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. तरच, खेळाचा आणि खेळाडूंना विकास होईल. - डॉ. विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड
लोकमत महागेम्ससाठी पाठिंबा दिल्याचा खूप आनंद आहे. खेळाला पाठिंबा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंनी गुणवत्ता दाखवून दिली. सर्व क्षेत्रातील मुलांना, समाजाला मदत करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि पुढेही राहील. - तृप्ती अभय भुतडा, सहसंस्थापिका अभय भुतडा फाउंडेशन
लोकमत महागेम्सच्या माध्यमातून या मुलांना मैदानावर आणण्यासाठी ही महत्त्वाची स्पर्धा होती. आज लोकमतसाठी सर्वात आनंदाचा क्षण आहे. भविष्यातील ऑलिम्पिक खेळाडूंना लहानपणापासूनच आपली कौशल्ये तपासण्याची संधी मिळावी यासाठी ही स्पर्धा आहे. भविष्यात ही स्पर्धा अनेक खेळाडू घडवेल असा विश्वास वाटतो.- रुचिरा दर्डा, संचालिका, लोकमत कॅम्पस क्लब