आमचेही म्हणणे ऐकून घ्या...! पुरुषांची व्यथा, पुरुष हक्क संरक्षण समितीकडे वर्षभरात ३०० तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:58 IST2025-11-19T14:57:23+5:302025-11-19T14:58:02+5:30
समाजात महिलांच्या त्रासाला बळी पडणाऱ्या पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांचेही म्हणणे पोलिसांनी ऐकून घ्यायला हवे

आमचेही म्हणणे ऐकून घ्या...! पुरुषांची व्यथा, पुरुष हक्क संरक्षण समितीकडे वर्षभरात ३०० तक्रारी
नम्रता फडणीस
पुणे: तरुणाचे लग्न आई-वडिलांच्या पसंतीनुसार झाले. मुलगी नात्यातीलच होती. लग्नापूर्वी संवाद साधताना तरुणीने आपण छान व्यवस्थित राहू, असे आश्वासन दिले. पण, लग्नानंतर पत्नी बदलली. सासू-सासरे नकोत, केवळ पतीच हवा अशी तिची अजब मागणी. आई आजारी पडली आणि तिला बघायला गेले, तिची काळजी घेतली की, पत्नीला राग यायचा. पती या सततच्या त्रासाला कंटाळला होता. शेवटी पतीने आत्महत्येचा निर्णय घेतला. मात्र, पुरुष हक्क संरक्षण समितीने पतीचे समुपदेशन करून त्याला आत्महत्या करण्यास परावृत्त केले, पण ही केवळ एका पुरुषाची समस्या नाही, समाजात महिलांच्या त्रासाला बळी पडणाऱ्या पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांचेही म्हणणे पोलिसांनी ऐकून घ्यायला हवे. या त्यांच्या म्हणण्याकडेही दुर्लक्ष केले जातेय. त्यामुळे त्यांनाही हवाय महिलांप्रमाणे स्वतंत्र कायदा अन् महिला दिनाप्रमाणेच पुरुष हक्क दिन !
पती फिरायला नेत नाही. तो माझे ऐकत नाही. मला तुझ्या आई-वडिलांबरोबर राहायचे नाही. आपण वेगळे राहू, अशा अनेक कुरबुरी सगळ्याच घरात ऐकायला मिळतात. मात्र, काही महिला हा वाद इतका विकोपाला नेतात की कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत सरळ तक्रार करून पतीसह त्याच्या कुटुंबीयांना न्यायालयात खेचतात. पतीने पत्नीला दिवसभरात फोन केला नाही किंवा वाढदिवसाला गिफ्ट दिले नाही, अशा किरकोळ गोष्टींसाठी पोलिस ठाण्याची पायरी चढली जाते. यासाठी पत्नीकडून पतीला विनाकारण त्रास दिला जात आहे. सततचा मानसिक ताण सहन न झाल्यामुळे पुरुष आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. कित्येकदा न्यायालयातही पत्नीकडून काय त्रास होतो? हे सांगताना पुरुष आसवांना मोकळी वाट करून देतात. पुरुषांचे पोलिसांकडे एकच म्हणणे आहे, आमचेही ऐकून घ्यावे, याकडे पुरुष हक्क संरक्षण समितीने लक्ष वेधले आहे.
आमचे लग्न झाले. आम्ही लग्नानंतर हनीमूनला गेलो. हनीमूनवरून आल्यावर ती माहेरी गेली. मात्र, पुन्हा सासरी येण्याचे नावच घेत नव्हती. मला काही कळलेच नाही की माझे काय चुकले? मी तिला खूप फोन केले. विनवण्या केल्या. एके दिवशी अचानक तिने माझ्यासह आई-वडिलांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली. पोलिस स्टेशनच्या फेऱ्या झाल्या. पण, पोलिस आमचे काहीच ऐकून घेत नाहीत. लग्न करून चूक केली का? - पीडित पती.
पुरुष हक्क संरक्षण समितीकडे वर्षभरात पुरुषांच्या ३०० तक्रारी येतात. समितीकडून पुरुषांचे समुपदेशन केले जाते. आज संपूर्ण देशभर ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला, भगिनींना महिला दिनाच्या निमित्ताने सन्मानित केले जाते. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परंतु, जसा समाज व सरकारकडून महिला दिन साजरा केला जातो. तसाच पुरुष दिन का साजरा करत नाहीत.? महिला दिनाप्रमाणेच पुरुष दिन देखील साजरा व्हायला हवा. - ॲड. शिवाजी (अण्णा) कराळे पाटील, जिल्हाध्यक्ष, पुरुष हक्क संरक्षण समिती, अहमदनगर.