Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींसाठी ‘ई-केवायसी’चे शेवटचे २ दिवस; चुकीची माहिती, तांत्रिक अडचणींमुळे हजारो महिला अजूनही प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:56 IST2026-04-29T14:53:41+5:302026-04-29T14:56:40+5:30

पुणे जिल्ह्यात या योजनेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून, तब्बल २१ लाखांहून अधिक महिला पात्र लाभार्थी म्हणून नोंदल्या गेल्या आहेत

Last 2 days of 'e-KYC' for dear sisters; Thousands of women still waiting due to incorrect information, technical difficulties | Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींसाठी ‘ई-केवायसी’चे शेवटचे २ दिवस; चुकीची माहिती, तांत्रिक अडचणींमुळे हजारो महिला अजूनही प्रतीक्षेत

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींसाठी ‘ई-केवायसी’चे शेवटचे २ दिवस; चुकीची माहिती, तांत्रिक अडचणींमुळे हजारो महिला अजूनही प्रतीक्षेत

पिंपरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल रोजी संपणार आहे, त्यामुळे लाभार्थी महिलांकडे आता फक्त आज आणि उद्या असे दोनच दिवस शिल्लक आहेत. पुणे जिल्ह्यात या योजनेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून, तब्बल २१ लाखांहून अधिक महिला पात्र लाभार्थी म्हणून नोंदल्या गेल्या आहेत; परंतु तांत्रिक अडचणी, चुकीची माहिती आणि पडताळणी प्रक्रियेमुळे हजारो महिलांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात पोर्टलवर प्राप्त अर्जांची संख्या ११ लाख २४ हजार ९२० असून, 'नारीशक्ती'अंतर्गत ९ लाख ७६ हजार ६६० महिलांची नोंद आहे. अशी जिल्ह्यातील एकूण पात्र लाभार्थी संख्या २१ लाख १ हजार ५८० असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. राज्यात पोर्टलवर प्राप्त अर्जांची संख्या १ कोटी १२ लाख ७० हजार २६१ आहे आणि त्यापैकी १ कोटी ६ लाख ६९ हजार १३९ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

ई-केवायसीमध्ये चुकीचे पर्याय; महिलांची धावपळ

अनेक महिलांकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले होते. त्यामुळे पात्र असूनही अनेक अर्ज अपात्र ठरले. या महिलांना पुन्हा संधी दिली असून, अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, योजनेतील तांत्रिक त्रुटींमुळे पुणे जिल्ह्यातील अडीच लाख महिलांचे अर्ज सुरुवातीला पुन्हा पडताळणीसाठी ठेवले होते.

योजनेच्या निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांची छाननी प्रशासनाने सुरू केली आहे. विशेषतः ज्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे अशा ७५ हजार १०० हून अधिक महिलांची पडताळणी सुरू होती. दरम्यान, पुणे जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल १२०१ पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने लाभार्थी पडताळणी मोहीम अधिक कडक केली आहे.

ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे 

- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र / जुने रेशन कार्ड / मतदान ओळखपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र (गरजेनुसार)
- बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक
- लाभार्थी महिलेचा फोटो व हमीपत्र
- नवविवाहितांसाठी विवाह प्रमाणपत्र

कोण आहेत पात्र?

- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला
- कुटुंबातील एक अविवाहित महिला
- वय २१ ते ६५ वर्षे
- वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी

कोण ठरणार अपात्र?

- वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त
- आयकरदाता कुटुंब
- सरकारी कर्मचारी / निवृत्तिवेतनधारक
- कुटुंबात चारचाकी वाहन
- खासदार, आमदार किंवा शासकीय मंडळातील पदाधिकारी असलेले कुटुंब
- अन्य शासकीय योजनेतून दरमहा १५०० रुपयांपेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या महिला

अंतिम मुदतीचे शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे अर्जदारांनी आधार कार्डावरील नाव, जन्मतारीख, पत्ता आणि बँक तपशील अचूक भरावा. चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे अर्ज रखडू शकतो.- रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

Web Title : लाड़की बहिन योजना: ई-केवाईसी के अंतिम दो दिन, कई प्रतीक्षारत।

Web Summary : लाड़की बहिन योजना ई-केवाईसी की समय सीमा नजदीक। पुणे में भारी भागीदारी। तकनीकी समस्याएँ और गलत डेटा से आवेदन में देरी। महिलाओं से ई-केवाईसी तुरंत पूरा करने का आग्रह।

Web Title : Ladki Bahin Yojana: Last two days for e-KYC, many await.

Web Summary : Ladki Bahin Yojana e-KYC deadline nears. Pune sees high participation. Technical issues and incorrect data delay applications. Women urged to complete e-KYC promptly.