कात्रज चौक-नवले पूल डीपी रस्ता कागदावरच; भूसंपादनासाठी लागणार अडीचशे ते तीनशे कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:52 IST2025-11-25T12:52:08+5:302025-11-25T12:52:56+5:30
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नऱ्हे ते वडगाव पूल या दरम्यानच्या सेवा रस्त्याचे भूसंपादन करण्यास सध्या तरी महापालिकेचे प्राधान्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

कात्रज चौक-नवले पूल डीपी रस्ता कागदावरच; भूसंपादनासाठी लागणार अडीचशे ते तीनशे कोटी
हिरा सरवदे
पुणे: कात्रज चौक ते नवले पूल या दरम्यान महापालिकेच्या २००८ च्या विकास आराखड्यात (डीपी) समावेश असलेला १२ मीटर रुंदीचा सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) अद्यापही कागदावरच आहे. रस्त्याच्या जागेवर बांधकामे आणि विविध प्रकारे व्यवसाय थाटण्यात आले आहेत. दरम्यान, ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला अडीचशे ते तीनशे कोटींची गरज लागणार आहे. मात्र, मुंबई-बंगळुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नऱ्हे ते वडगाव पूल या दरम्यानच्या सेवा रस्त्याचे भूसंपादन करण्यास सध्या तरी महापालिकेचे प्राधान्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग नवीन बोगद्यातून सरळ केल्यानंतर कात्रज-देहूरोड बायपास अंतर्गत असलेला कात्रज चौक ते नवले पूल अनेक वर्षे दुर्लक्षित होता. पश्चिम, दक्षिण आणि मध्य शहराला जोडणाऱ्या या महत्त्वाचा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) ताब्यात असलेला हा रस्ता महापालिकेकडे देण्यात आला. मात्र, हा रस्ता एनएचएआयने विकसित करावा, अशी मागणी केली जात होती. त्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली. यामुळे एनएचएआयमार्फत रस्त्याचे सहा पदरीकरण आणि कात्रज चौकात उड्डाणपूल ही कामे केली जात आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या २००८ च्या डीपीमध्ये महामार्गाच्या दोन्ही बाजूस कात्रज चौक ते बालेवाडी या दरम्यान १२ मीटर रुंदीचा सेवा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. एनएचएआयने कात्रज चौक ते नवले पूल यादरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण आणि त्याच्या शेजारी सेवा रस्ता विकसित केला आहे. मात्र, महापालिकेच्या डीपीत प्रस्तावित केलेल्या १२ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे कोठेही अस्तित्व दिसत नाही. हा सेवा रस्ता कागदावरच राहिला असून रस्त्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात बांधकामे आणि पत्र्याचे शेड, व्यावसायिकांचे साहित्य आहे. शहराच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन आणि पीएमआरडीएकडून शहराच्या बाहेरील बाजूने रिंगरोड करण्याचे नियोजन असताना महापालिका मात्र आपल्याच डीपीतील रस्ते विकसित करण्यास अनुत्सुक असल्याचे समोर येत आहे.
वारजे परिसरात दिसते डीपीतील सेवा रस्त्याचे अस्तित्व
महापालिकेच्या डीपीतील सेवा रस्त्याचे काहीसे अस्तित्व वारजे परिसरात दिसते. या ठिकाणी महामार्गाशेजारी एनएचएआयचा सेवा रस्ता आणि त्याशेजारी महापालिकेचा सेवा रस्ता, असे तीन रस्ते दोन्ही बाजूस दिसतात. मात्र, हे चित्र जेथे जागा ताब्यात आली आहे, तेथेच दिसते. उर्वरित भागात डीपीतील सेवा रस्त्याचा कुठे मागमूसही नाही.
महापालिकेच्या डीपी रस्त्याची कल्पना नाही
एनएचएआयकडून कात्रज ते देहूरोड बायपास रस्त्यावर अनेक ठिकाणी सेवा रस्ते करण्यात आले आहेत. तसेच कात्रज ते नवले पूल या दरम्यानही आम्ही दोन्ही बाजूस सेवा रस्ता केला आहे. हे सेवा रस्ते पूर्णपणे एनएचएआयच्या जागेतच असून महापालिकेच्या डीपी रस्त्याबाबत कल्पना नसल्याचे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेच्या जुन्या हद्दीत कात्रज-देहूरोड बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूस १२ मीटरचे रस्ते २००८ च्या मंजूर डीपीमध्ये आहेत. मात्र, बहुतांश जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. टीडीआर आणि एफएसआयच्या मोबदल्यात ज्यांना जागा दिल्या आहेत, त्या जागेवर वारजे परिसरात रस्ते विकसित केले आहेत. कात्रज-नवले पुलादरम्यानची जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. सध्या आमचे प्राधान्य मुंबई-बंगळुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नऱ्हे ते वडगाव पूल या दरम्यानच्या सेवा रस्त्याचे भूसंपादन करण्यास आहे. - अनिरुद्ध पावसकर, विभाग प्रमुख, पथ विभाग, महापालिका.
शहराच्या वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशा वेळी महापालिकेने डीपीतील रस्ते विकसित करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नाही. कात्रज ते नवले पूर हा डीपीतील सेवा रस्ता कागदावर राहण्यास महापालिकेची उदासीनता कारणीभूत आहे. - विशाल तांबे, माजी नगरसेवक