पुणे : शहरातील हनुमान टेकडीवर गेल्या काही वर्षांपासून लुटमारीच्या वाढत्या घटना ही मोठी डोकेदुखी बनली होती. सर्वसामान्य नागरिकांकडून डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल होत होत्या. निर्जन स्थळ असल्याने, तसेच टेकडीवर ये-जा करण्यासाठी सात ते आठ मार्ग असल्याने लूटमार करणारे पकडले जात नव्हते. दरम्यान, गेल्यावर्षी बोपदेव घाटात बलात्काराची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये हनुमान टेकडीवर पुन्हा लुटमारीचा प्रकार घडला. यामुळे हनुमान टेकडीवर लूटमार करणाऱ्या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत अटक करणे हे डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्यासमोर आव्हान होते. यानुसार त्यांनी सूचना दिल्या आणि तपासाची चक्रे फिरली अन् २०१६ पासून रेकॉर्डवर असणारे आरोपी यामुळे पकडले गेले.
फिक्स पॉइंट देण्यासारखी परिस्थिती नव्हती
हनुमान टेकडीवर वारंवार होणाऱ्या लुटमारीच्या घटनांमुळे तेथे जाणाऱ्या पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. या परिसरात सीसीटीव्ही, लाइट नसल्याने लूटमार करणारे बिनधास्त वावरत होते. ७-८ ठिकाणांहून टेकडीवर ये-जा करता येत असल्याने २४ फिक्स पॉइंट देण्यासाठी तेथे परिस्थिती नव्हती. त्यामुळे आरोपींना पकडायचे कसे? हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता.
२ जानेवारी रोजी चौथी घटना..
पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणे सुरू असतानाच २ जानेवारी रोजी हनुमान टेकडीवर लुटमारीची चौथी घटना घडली. कोयत्याचा धाक दाखवून सोन्याची चेन लुटारूंनी हिसकावली होती. तोपर्यंत पोलिसांकडे आरोपींसंदर्भात कोणतीही माहिती नव्हती.
पुन्हा परिसरातील सीसीटीव्ही तपासले
या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक निंबाळकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे (डिटेक्शन ब्रँच) ३ पथके स्थापन करून पुन्हा पहिल्यापासून या सगळ्या प्रकरणांचा तपास करण्याचा सूचना दिल्या. त्यानुसार टेकडीवरून खाली आल्यानंतर रस्त्यावरील दुकानांसमोर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली. यावेळी एक दुचाकी दोनदा या परिसरात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या दुचाकीवरील एक स्टिकर पोलिसांना निष्पन्न झाले. त्यापूर्वी केलेल्या तांत्रिक तपासात पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते.
दुचाकी पर्वती परिसरातील असल्याची माहिती
पोलिसांनी यापूर्वी हनुमान टेकडीवर घडलेल्या घटनांची माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा वर्ष २०१६ मध्ये झालेल्या लुटमारीच्या प्रकरणात जे आरोपी अटक होते, त्यांचा पत्ता पोलिसांना काढला. तो पत्ता पर्वती परिसरात होता. त्यानुसार ४-५ दिवस डेक्कन पोलिस दररोज पर्वती परिसरात पायी फिरून ते स्टिकर असलेली दुचाकी शोधत होते. अखेर पाचव्या दिवशी पोलिसांना ‘ती’ दुचाकी सापडली.
आरोपी एक नवा, एक जुना..
संबंधित दुचाकीमालकाला पोलिसांना ताब्यात घेत विचारपूस केली असता, वर्ष २०१६ मध्ये घडलेल्या एका गुन्ह्यात आरोपीने ती दुचाकी वापरली होती. त्याने ती लुटमारीत सहभागी झालेल्या नव्या साथीदाराकडे दिली होती. यानंतर पोलिसांनी नव्या, जुन्या सगळ्या हनुमान टेकडीवर लूटमार करणाऱ्यांना ताब्यात घेत, अटक केली. आरोपींनी चारही गुन्ह्यांची कबुली देत, लुटलेला ऐवजदेखील पोलिसांना परत केला.
पंचनामा करण्यासाठी गेले अन् आरोपी सापडला..
दरम्यान, अटक केलेल्या आरोपींना घेऊन पोलिस हनुमान टेकडी येथे पंचनामा करण्यासाठी गेले असता, एक तरुण एका कोपऱ्यात बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याची बॅग तपासली असता त्यात कोयता आढळला. तो या लुटमारीच्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकीच एक होता. त्याला देखील पोलिसांनी अटक केली.
गुन्हेच नाहीत
२०१५ पासून या टोळीने हनुमान टेकडी परिसरात अनेकांना लुटले. काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली नाही. मात्र, जानेवारी महिन्यात आरोपी जेरबंद झाल्यापासून आजपर्यंत या परिसरात एकही लुटमारीची घटना घडलेली नाही. न्यायालयाने देखील या आरोपींना २ वर्षांसाठी जिल्हाबंदीचे आदेश दिले असून, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
प्रत्येक गुन्हेगार हा त्याच्या गुन्हेगारीच्या पद्धतीवरूनच पकडला जातो. पोलिसांनी त्या पद्धतीने अभ्यास केला, मागील प्रकरणांची सखोल माहिती घेतली तर आरोपी निश्चित पकडले जातात. आरोपींना त्यांचे गुन्हेगारी कृत्य करताना जो स्ट्राँग पॉइंट वाटत असतो तोच त्यांचा खरा वीक पॉइंट असतो. - गिरीषा निंबाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डेक्कन पोलिस ठाणे