Maharashtra Rain: विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार हजेरी; राज्यात पुढील दोन - तीन दिवस पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 13:34 IST2024-08-18T13:33:46+5:302024-08-18T13:34:19+5:30
पुणे शहरात मागील आठवड्यपासून उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते

Maharashtra Rain: विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार हजेरी; राज्यात पुढील दोन - तीन दिवस पावसाची शक्यता
पुणे: गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने शनिवारी (दि. १७) सायंकाळी पुण्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. दिवसभर कडक उन्ह असल्याने चांगलाच घाम फुटला आणि सायंकाळनंतर जोरदार पावसाने दिलासा दिला. अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर चांगलाच होता, परिणामी अनेक रस्त्यांवर पाणी साठले.
राज्यात शनिवारी (दि. १७) काही भागात जोरदार ते मध्यम सरी कोसळल्या, तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण होते. दिवसभर अनेक भागात उन्हाचा कडाका जाणवत होता. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रविवारी (दि. १८) काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट असणार आहे, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक जिल्ह्यातही यलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सोमवारी (दि. १९) काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवारी (दि. २०) जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुण्यात यलो अलर्ट
पुणे शहरात शनिवारी दिवसभर उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते. तसे तर गेल्या आठवड्यापासूनच उष्णता जाणवत होती. त्यानंतर शनिवारी सायंकाळी मात्र आकाशात ढगांची गर्दी झाली आणि जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पुढील दोन-तीन दिवस पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. २१ ऑगस्ट रोजी पुण्यात ऑरेंज अलर्ट असणार आहे.