“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 06:21 IST2026-01-05T06:21:11+5:302026-01-05T06:21:16+5:30
महाराष्ट्रात मराठीचा मान राखलाच पाहिजे. आमचा जो महापौर होईल, तो मराठीच होणार, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पेशव्यांच्या काळामध्ये गायकवाड, शिंदे आणि होळकर ही तीन संस्थाने उभी राहिली होती. गायकवाड हे बडोद्याचे महाराज आणि तिथे मराठेशाहीचे साम्राज्य उभे राहिले. तरी तिथे सगळे महापौर गुजराती का होतात?, हा महाराष्ट्र आहे. इथल्या प्रत्येक शहरातील महापौर हा मराठीच होणार. इथे कसले हिंदू, मराठी? आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. महाराष्ट्रातील शहरांमध्ये मराठीचा मान राखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल, तो मराठीच होणार, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
२० वर्षे जेलमध्ये होते आणि आता सुटून आले!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेसाठी २० वर्षांनंतर शिवसेना भवनात आले, याचा उल्लेख खा. संजय राऊत यांनी केला. त्यावर राज मिश्किलपणे म्हणाले, राऊत यांनी वारंवार २० वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनमध्ये आले, असा उल्लेख केला. त्यामुळे असे वाटत आहे की, २० वर्षे जेलमध्ये होते आणि आता सुटून आले आहेत.