Heatwave : पुणेकरांनो, आरोग्य सांभाळा; उन्हाच्या झळांनी वाढले आजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 09:32 IST2026-04-30T09:31:54+5:302026-04-30T09:32:31+5:30
Heatwave - दूषित अन्न-पाण्यामुळे आजारांचा धोका; अतिसार-उलट्या, पोटदुखीचे वाढले रुग्ण

Heatwave : पुणेकरांनो, आरोग्य सांभाळा; उन्हाच्या झळांनी वाढले आजार
पुणे : शहरातील उन्हाचा पारा ४१ अंशावर पोहोचला असून, वाढत्या उष्णतेचा फटका पुणेकरांना बसत आहे. प्रचंड उष्णतेमुळे शहरात नागरिकांच्या पचनसंस्थेशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. मागील काही दिवसांत अतिसार, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास जाणवत असलेल्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे शासकीय रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांतील ओपीडीमध्ये रुग्णांचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.
सध्या तीव्र उकाड्यामुळे शरीरातील पाणी आणि क्षार (सोडियम) झपाट्याने कमी होत असल्यामुळे निर्जलीकरण (डिहायड्रेशन) वाढत आहे. परिणामी अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी अशी उष्माघाताची लक्षणे दिसून येत आहेत. यासोबतच दूषित अन्न व पाण्यामुळेदेखील संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक वाढला असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. उन्हाळ्यात बाहेरील थंड पेये, पाणी आणि खाद्यपदार्थांचे सेवन वाढते. शाळांना सुट्या, लग्नसराई आणि पर्यटनामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेरचे अन्न सेवन करतात. मात्र, उघड्यावर विक्री होणारे पदार्थ, कापून ठेवलेली फळे, तसेच शिळे अन्न यामध्ये जिवाणूंची वाढ वेगाने होते. अशी फळे आणि अन्नपदार्थ खाण्यास आल्यास अतिसार आणि उलट्यांचे प्रमाण वाढत आहे.
विशेषतः डिलिव्हरी कर्मचारी, मार्केटिंग क्षेत्रातील कामगार, वाहतूक पोलिस, बस-रिक्षा-टॅक्सी चालक, फेरीवाले, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजार असलेले रुग्ण हे अधिक धोक्याच्या गटात असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. उष्णतेमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने संसर्गाचा धोका वाढतो. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य व महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांमध्ये विशेष खाटा राखीव ठेवल्या आहेत. नागरिकांनी दुपारी १२ ते २ या वेळेत बाहेर जाणे टाळावे, तसेच आवश्यक असल्यास पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
काय काळजी घ्यावी
नागरिकांनी शक्यतो घरचे स्वच्छ व ताजे अन्न सेवन करावे. उघड्यावर मिळणारे पाणी व खाद्यपदार्थ टाळावेत. भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत. ताजी फळे व भाज्या नीट धुऊनच खाव्यात. लिंबूपाणी, ओआरएस, ताक यासारखे द्रवपदार्थ घ्यावेत. उन्हात जाणे टाळावे; बाहेर पडताना टोपी, छत्री, गॉगल वापरावा. सैलसर, फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत.
ओपीडीमध्ये दररोज ३ ते ४ रुग्ण अतिसाराच्या तक्रारींसह येत होते, आता ही संख्या १० ते १५ वर पोहोचली आहे. उष्णतेमुळे शरीरातील द्रव आणि क्षारांचे प्रमाण कमी होत असल्याने त्रास वाढतो आहे. उन्हात काम करणारे मजूर, शेतकरी, तसेच बैठ्या पत्र्याच्या घरात राहत असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ऊन व उष्णतेपासून बचाव करणे, भरपूर पाणी, ओआरएस आणि लिंबूपाणी घेणे गरजेचे आहे. - डॉ. अविनाश भोंडवे, आरोग्य सल्लागार व फिजिशियन
उष्णतेत आधीच कापून ठेवलेली फळे, उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ आणि थंड पेये, आइस्क्रिम, घरात होणारे दुग्धजन्य पदार्थ हे जिवाणूंसाठी पोषक माध्यम ठरतात. त्यामुळे असे पदार्थ टाळणे अत्यावश्यक आहे. तळलेले, तेलकट आणि शिळे अन्न सेवन केल्यास पचनाचे विकार वाढण्याची शक्यता असते. - डॉ. धनंजय ओगले, गॅस्ट्रोलॉजिस्ट