"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 06:39 IST2026-05-01T06:38:38+5:302026-05-01T06:39:39+5:30

केवळ भौगोलिक रचनेतून नव्हे, तर महाराष्ट्र धर्मातून महाराष्ट्र प्रकट होतो. महाराष्ट्र म्हणजे इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचा समुच्चय आहे.

A special article on Maharashtra progress penned by CM Devendra Fadnavis on the occasion of Maharashtra Day | "महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र

"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, 
महाराष्ट्र राज्य

यंदाचा महाराष्ट्र दिन विशेष आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीचे हे वर्ष आहे, संत गाडगे महाराज यांच्या १५०व्या जयंतीचे वर्ष आहे, चवदार तळ्याच्या ऐतिहासिक लढ्याचे शताब्दी वर्ष आहे. हे वर्ष आपण समता आणि सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरे करतो आहोत. केवळ भौगोलिक रचनेत महाराष्ट्र व्यक्त होत नाही तर महाराष्ट्र धर्मातून महाराष्ट्र प्रकट होतो. महाराष्ट्र म्हणजे इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचा समुच्चय आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली स्वराज्याची प्रेरणा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला न्याय आणि प्रज्ञेचा पाया, महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पेटविलेली शिक्षण आणि समतेची मशाल, लोकमान्य टिळकांनी जागविलेली राष्ट्रभावना, देशासाठी अनन्यसाधारण यातना सहन करण्याची ताकद देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्यांच्या विचारांचा एकत्रित संगम म्हणजे महाराष्ट्र. केवळ भौगोलिक रचनेत महाराष्ट्र व्यक्त होत नाही तर महाराष्ट्र धर्मातून प्रकट होतो.

जगातील ३०वी अर्थव्यवस्था 
महाराष्ट्र देशाच्या जीडीपीमध्ये १३.५ टक्क्यांहून अधिक योगदान देत आहे. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राने १,६४,८७५ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली. हे प्रमाण देशात आलेल्या एकूण एफडीएच्या ३९ टक्के इतके आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने ३० लाख कोटींचे सामंजस्य करार केले, ज्यातून ४० लाख रोजगार निर्माण होणार आहेत. जगात आर्थिक समस्या असताना महाराष्ट्राने जगातील ३०वी अर्थव्यवस्था म्हणून झेप घेतली आहे, हा विकास समतोल असावा, याचा विचार करून गडचिरोली, धुळे, नंदुरबार यांसारखी शहरेसुद्धा आता गुंतवणुकीच्या नकाशावर आली आहेत.

जलयुक्त शिवारचे लक्ष्य
यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे पेरणीची घाई करू नका. कृषी विभागाकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनांकडे लक्ष द्या. राज्य शासन म्हणून आम्ही आधीपासूनच पाणी, चारा याचे नियोजन प्रारंभ केले आहे. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामांना गती देण्यास व प्राधान्याने निधी देण्यास सांगितले आहे. राज्यात खते आणि बियाणांची कोणतीही कमतरता नाही. लिंकिंग करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्य शासन तुमच्यासोबत आहे.

शेतकरी कर्जमाफी योजना
गेल्यावर्षी पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर १५,५७६ कोटी रुपये जमा केले गेले. शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आपण जाहीर केली आहेच. शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे, आता सौरऊर्जेचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्राला २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न आणि त्या दिशेने आपण आत्तापासूनच काम सुरू केले आहे.

सुप्रशासनासाठी अनेक पावले
शासनाच्या सर्व सेवा व्हॉट‌्सअ‍ॅपवर देण्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला आहे. गडचिरोली नक्षलमुक्त झाले आहे आणि पोलाद शहर म्हणून नावारूपास येण्यासाठी वेगाने पाऊले टाकते आहे. महाराष्ट्रातील ११ किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची ही जगाने घेतलेली दखल आहे. महाराष्ट्र मजबूत, आत्मनिर्भर, महत्त्वाकांक्षी आहे. शेतकरी, कामगार, महिला, तरुण, उद्योजक प्रत्येकासाठी या राज्य शासनाने आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ च्या स्वप्नात महाराष्ट्र सर्वात पुढे राहील, हे माझे महाराष्ट्रदिनी आपल्याला वचन आहे.

वाढवण येथे चौथे बंदर 
महाराष्ट्र आज देशातच नाही, जगातही पायाभूत सुविधांच्या निर्मितीत आघाडीवर आहे. सध्या मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये १७३ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका कार्यरत आहेत. दरवर्षी ५० कि.मी.ची मेट्रो सेवेत येईल, असे नियोजन आहे. समृद्धीच्या साथीला शक्तिपीठ येतो आहे. वाढवण येथे चौथे मुंबई बंदर विकसित केले जाणार आहे, जे जगातील ‘टॉप टेन’ पैकी एक असेल. आज महाराष्ट्रदिनी मला एक अत्यंत आनंदाची बातमी सांगायची आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील १३.३ कि.मी.चा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आज जनतेसाठी खुला होत आहे. यामुळे दोन शहरांमधील अंतर सुमारे ६ कि.मी.ने आणि प्रवासाचा वेळ २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे.

५० लाख लखपती दीदी
४० लाखांहून अधिक महिला आता ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. उमेद अभियानांतर्गत ६४ लाखांहून अधिक कुटुंबांना बँक कर्जे उपलब्ध करून दिले आहे. लखपती दीदींची संख्या यावर्षी ५० लाखांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. लाडकी बहीण योजना आहेच. सारथी, बार्टी, महाज्योती, आर्टी, वनार्टी, अमृतच्या माध्यमातून समावेशकतेची पायाभरणी केली जाते आहे. आमच्यासाठी विकास म्हणजे प्रत्येकाचे जीवन उंचावणे आहे.

Web Title : महाराष्ट्र की प्रगति: मुख्यमंत्री ने महाराष्ट्र दिवस पर आशाजनक राज्य पर प्रकाश डाला

Web Summary : महाराष्ट्र एक अग्रणी अर्थव्यवस्था है, जो निवेश आकर्षित कर रही है और रोजगार पैदा कर रही है। बुनियादी ढांचे, ऋण माफी और मुफ्त बिजली जैसी योजनाओं के साथ किसान समर्थन और पहलों के माध्यम से महिला सशक्तिकरण पर ध्यान केंद्रित किया गया है। 2047 तक 5 ट्रिलियन डॉलर की अर्थव्यवस्था का लक्ष्य।

Web Title : Maharashtra's Progress: Chief Minister Highlights Promising State on Maharashtra Day

Web Summary : Maharashtra is a leading economy, attracting investment and creating jobs. Focus on infrastructure, farmer support with schemes like loan waivers and free electricity, and women empowerment through initiatives. Aiming for a 5 trillion dollar economy by 2047.