Heatstroke Death: राज्यात उष्माघाताचे ५५ रुग्ण; मृत्यूच्या २ घटनांबाबत साशंकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:11 IST2026-04-29T09:38:14+5:302026-04-29T15:11:21+5:30
Maharashtra Heatstroke Deaths: आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Heatstroke Death: राज्यात उष्माघाताचे ५५ रुग्ण; मृत्यूच्या २ घटनांबाबत साशंकता
पुणे : राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णसंख्येवर आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. एकूण ५५ उष्माघातग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ३८ रुग्ण एक मार्च ते २६ एप्रिल या कालावधीत आढळले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत १७ रुग्ण नोंदविण्यात आले होते. याच कालावधीत दोन मृत्यूंची नोंद झाली असली, तरी त्या मृत्यूंचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने आरोग्य विभागाने त्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग, बालरोग आणि आपत्कालीन विभागांत मिळून एकूण ३ लाख ८२ हजार ७२५ रुग्णांनी विविध आजारांसाठी उपचार घेतले. यामध्ये मुंबई महापालिका क्षेत्र, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या तुलनेने अधिक असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक १४ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल नाशिकमध्ये ६, गडचिरोली व रत्नागिरी येथे प्रत्येकी ४, तर अहिल्यानगरमध्ये ३ रुग्णांची नोंद झाली आहे. रायगड, पुणे, पालघर, जालना, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर आणि धुळे येथे प्रत्येकी २, तर अकोला, अमरावती, भंडारा, जळगाव, परभणी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे जिल्ह्यांत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विशेष ‘उष्माघात कक्ष’ सुरू करण्यात आले असून, ग्रामीण रुग्णालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक औषधे आणि द्रवपदार्थांचीही व्यवस्था केली आहे.
उष्माघाताची सुरुवात सौम्य लक्षणांपासून होत असली तरी वेळेवर उपचार न मिळाल्यास ती गंभीर ठरू शकते. शरीराचे तापमान वाढणे, डोकेदुखी, चक्कर, अशक्तपणा, मळमळ, त्वचा कोरडी व गरम होणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि काही वेळा बेशुद्धावस्था ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.
अत्याधिक उष्णतेत दीर्घकाळ राहणे, शरीरातील पाण्याची कमतरता आणि दुपारच्या कडाक्याच्या उन्हात काम करणे ही उष्माघाताची प्रमुख कारणे मानली जातात. त्यामुळे नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत, तसेच डोक्याचे संरक्षण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.