Heatstroke : उष्माघाताचा वाढता आलेख, राज्यात २२९ रुग्ण, तीन संशयित मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 18:12 IST2026-05-09T18:11:59+5:302026-05-09T18:12:12+5:30
Heatstroke : यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने वारंवार ४० ते ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे.

Heatstroke : उष्माघाताचा वाढता आलेख, राज्यात २२९ रुग्ण, तीन संशयित मृत्यू
पुणे : राज्यात वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, गेल्या देान महिन्यांत उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. १ मार्च ते ७ मेदरम्यान राज्यभरात उष्माघाताचे एकूण २२९ रुग्ण आढळले असून, त्यांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. याशिवाय आणखी तीन संशयित मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने वारंवार ४० ते ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक ७९ रुग्णांची नोंद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाली असून, त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात २९ रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये १९, अमरावतीत १२, बुलढाण्यात ११, गडचिरोलीत ८, अकोल्यात ७, तर अहिल्यानगर, रत्नागिरी, वर्धा आणि यवतमाळ येथे प्रत्येकी सहा रुग्ण नोंदवले गेले आहेत.
शुक्रवारी (दि. ८) लातूरमधील निलंगा तालुक्यातील ६० वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली. तसेच जळगाव जिल्ह्यातील ३४ वर्षीय फळविक्रेत्याचाही मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, उन्हाच्या तीव्रतेमुळे बाहेर काम करणारे मजूर, मार्केटिंग अथवा डिलिव्हरी काम करणारे कर्मचारी, वाहतूक पोलिस, रस्त्यावर काम करणारे कर्मचारी तसेच दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलके व सैल कपडे परिधान करावेत, डोके झाकून बाहेर पडावे आणि लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. ताप, चक्कर, मळमळ, डोकेदुखी, अशक्तपणा किंवा बेशुद्ध पडण्याची लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला
उष्णतेच्या लाटेदरम्यान अंगावर पुरळ येणे, अशक्तपणा, चक्कर येणे, स्नायूंना गोळे येणे, थकवा अशी सौम्य लक्षणे दिसू शकतात. मात्र तीव्र उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढतो. तरुणांमध्ये शारीरिक श्रमामुळे होणारा ‘एक्झर्शनल हीटस्ट्रोक’ अधिक दिसतो, तर मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांत ‘नॉन-एक्झर्शनल हीटस्ट्रोक’ अधिक आढळतो.
किडनी विकाराच्या रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी
दीर्घकालीन मूत्रपिंडविकार असलेल्या रुग्णांसाठी उन्हाळा अधिक धोकादायक ठरू शकतो. उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होऊन मूत्रपिंडांकडे जाणारा रक्तपुरवठा घटतो आणि गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. गर्भवती महिलांनीही विशेष काळजी गरज आहे. उष्णतेमुळे रक्ताभिसरणावर ताण येऊन अकाली प्रसूती, कमी वजनाचे बाळ, उच्च रक्तदाब यांसारख्या गुंतागुंती संभवू शकतात.