नशेच्या आहारी गेला; पोलिसांनी समुपदेशनासाठी बोलावला, रेकॉर्डवरील गुन्हेगाराने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:20 IST2025-11-19T12:19:51+5:302025-11-19T12:20:01+5:30
नातेवाइकांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. मात्र, तेथून कोणालाही न सांगता तो निघून गेला होता

नशेच्या आहारी गेला; पोलिसांनी समुपदेशनासाठी बोलावला, रेकॉर्डवरील गुन्हेगाराने उचलले टोकाचे पाऊल
पुणे: पोलिस ठाण्यात समुपदेशनासाठी बोलवलेल्या व्यक्तीने कृषी महामंडळाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १८) सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास घडली. समीर हमीद शेख (वय ४०, रा. गल्ली नं. १३, आंबेडकर नगर, मार्केटयार्ड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. समीर शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख हा काही काळापासून नशेच्या आहारी गेला होता. त्याने मंगळवारीही नशा केली होती. त्याच्या मानसिक स्थितीमुळे तो वारंवार आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याने १६ नोव्हेंबर रोजी पुलगेट चौकाजवळील उड्डाणपुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे नातेवाइकांनी त्याला १७ नोव्हेंबरला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. मात्र, तेथून कोणालाही न सांगता तो निघून गेला. मंगळवारी सकाळी घरी परतल्यावर त्याने फाशी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्याच्या पत्नीने ११२ या पोलिस कंट्रोल रूमच्या नंबरवर कॉल करून मदत मागितली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात आणून समुपदेशन केले. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात टाकण्यासाठी गाडीदेखील बोलवली होती. त्या दरम्यान समीर शेख याने नजर चुकवत तेथून निघून जात कृषी महामंडळाच्या बिल्डिंगच्या वरच्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन तिथून खाली उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.