महिलांची फसवणूक, लैंगिक शोषण, भोंदूगिरीचा वाढता विळखा; पुण्यात सुशिक्षितही अंधश्रद्धेच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:21 IST2026-03-28T12:20:50+5:302026-03-28T12:21:33+5:30
अपत्यप्राप्ती न होणे, घरातील अडचणी किंवा मानसिक तणाव यांचा गैरफायदा घेत भोंदू व्यक्ती महिलांना जाळ्यात ओढत असल्याचे प्रकार वाढत आहेत.

महिलांची फसवणूक, लैंगिक शोषण, भोंदूगिरीचा वाढता विळखा; पुण्यात सुशिक्षितही अंधश्रद्धेच्या जाळ्यात
पुणे: 'विद्येचे माहेरघर' अशी ओळख असलेल्या पुण्यातच भोंदूगिरीचे प्रकार वाढत असून, सुशिक्षित नागरिकही जादूटोणा आणि अघोरी प्रथांच्या आहारी जात असल्याचे समोर आले आहे. महिलांची फसवणूक, लैंगिक शोषण आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली घडणाऱ्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक बनली आहे. महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम, २०१३ अंतर्गत गेल्या चार वर्षांत पुणे शहरात २६ तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, त्यापैकी २४ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत दाखल झाले आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात अशा गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत महिलांचा सहभाग आणि ऐतिहासिक सामाजिक परिवर्तन, इतिहास पार्श्वभूमी आणि उत्क्रांती; डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचा अभ्यास ' या फाईल्ड प्रोजेक्टवर काम करताना सचिन नेलेकर यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळविली. त्यानुसार, २०२२ ते २०२५ या कालावधीत पुणे ग्रामीण भागात १९, तर शहरात २६ गुन्हे नोंदवले गेले आहेत. मात्र, अनेक घटना समोरच येत नसल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, राज्यातील मुंबई (1), अहिल्यानगर (1), संभाजीनगर (4) शहरांच्या तुलनेत पुण्यात दाखल गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे.
दरम्यान, अशोक खरात प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. खरातविरोधात लैंगिक अत्याचारासह जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत. कोरोना काळानंतर बुवाबाजी, तथाकथित महाराज आणि ज्योतिषांकडे वळणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. अघोरी उपायांच्या नावाखाली महिलांना फसवणे, ‘पूजा’च्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवणे, तसेच कौटुंबिक समस्यांवर उपाय म्हणून अघोरी विधींना भाग पाडणे, अशा प्रकारच्या गंभीर घटनांवर या कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. अपत्यप्राप्ती न होणे, घरातील अडचणी किंवा मानसिक तणाव यांचा गैरफायदा घेत भोंदू व्यक्ती महिलांना जाळ्यात ओढत असल्याचे प्रकार वाढत आहेत.
पुरोगामी महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी या कार्यात खूप खस्ता खाल्ल्या, टीका अपमान सहन केला. मात्र, आजच्या काळात राज्यातील भोंदू बाबांची वाढती संख्या हा समाज अधिक असुरक्षित असल्याची जाणीव करून देतो. बाजारपेठेतील मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार समाज जेवढा असुरक्षित तेवढा भोंदू बाबांची अधिक चलती आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामुळे या भोंदूबाबांच्या प्रसाराला अधिक गती मिळत आहे. लोक अजूनही जागृत होत नाहीत ही चिंतेची बाब आहे. अभ्यास करताना जाणवते की ग्रामीण भागापेक्षा शहरी भाग अधिक बळी पडत आहे. - सचिन नेलेकर, अभ्यासक
पुण्यात घडलेल्या काही घटना
२०२३ : एका २७ वर्षीय महिलेने आपल्या पतीसह सात नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पीडितेने आरोप केला होता की, अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली आणि घरगुती कलहातून तिचे मासिक पाळीचे रक्त जबरदस्तीने गोळा करण्यात आले. या प्रकरणात अनैसर्गिक लैंगिक संबंध विनयभंग आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.
२०२३; सिंहगड रोड परिसरात २८ वर्षीय महिलेला अपत्य प्राप्तीसाठी भोंदूबाबाच्या सांगण्यावरून सासरच्या मंडळींनी अघोरी पूजा करण्यास भाग पाडले. या पूजेत तिला नर आणि प्राण्यांच्या हाडांचे चूर्ण खाण्यास सक्ती करण्यात आली. हे प्रकरण थेट महाराष्ट्र विधानसभेत चर्चेला आले होते.
२०२५; हडपसरमध्ये घरावर आलेले संकट दूर करण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने महिलेला गंडवून साडेतीन लाखांचे दागिने चोरले आणि लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला.
२०२५ : हडपसरमध्ये सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आणि अघोरी प्रथांच्या नावाखाली २२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार केले. तिला निर्वस्त्र होऊन पूजा करण्यास भाग पाडण्यात आले आणि विरोध केल्यास लैंगिक छळ करण्यात आला.
२०२५ : कुटुंबातील आजारपण दूर करण्याच्या बहाण्याने एका 'आध्यात्मिक उपचारक' महिलेने आणि तिच्या सहकाऱ्यांनी एका आयटी अभियंत्याला १३ कोटी रुपयांना फसवले आणि अघोरी पूजा करण्यास भाग पाडले.
२०२५ : सांगवी परिसरात एका पतीने विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या गळ्याला कोयता लावून जबरदस्तीने अमानवी आणि अघोरी पूजा केली.
पुण्यात दाखल गुन्ह्यांची संख्या
वर्ष ......................................ग्रामीण .................शहरी ..............दाखल गुन्हे
2022 -----------------------------10--------------------10-------------------10
2023------------------------------02--------------------03-------------------03
2024....................................03........................07.......................07
2025------------------------------04........................06-------------------04
-------------------------------------------------------------------------------------------
एकूण------------------------------19--------------------26-------------------24