Gold import duty : आयात शुल्कवाढीने चिंतेचे ढग; मात्र गुंतवणुकीसाठी सोने खरेदी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:15 IST2026-05-14T12:15:44+5:302026-05-14T12:15:56+5:30
gold import duty - डिजिटल सोन्याचे महत्त्व वाढणार : ग्राहकांच्या घरातील सोनेही बाजारात येणार; नवीन ग्राहकांचा कल दोन-तीन दिवसांत होणार स्पष्ट; लग्नसराईमुळे बुकिंग केलेल्या दागिन्यांची खरेदी कायम

Gold import duty : आयात शुल्कवाढीने चिंतेचे ढग; मात्र गुंतवणुकीसाठी सोने खरेदी वाढणार
पिंपरी : सोने-चांदीच्या आयातीवरील १५ टक्के शुल्कवाढ आणि पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलेले सोने खरेदी टाळण्याचे आवाहन यामुळे सराफा बाजारावर चिंतेचे ढग दिसत आहेत. मात्र, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने ग्राहकांकडून सोन्याच्या खरेदीला पूर्णपणे ब्रेक लागण्याची शक्यता कमी असल्याचे मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.
आखातातील युद्धजन्य परिस्थिती, डॉलरच्या वाढत्या प्रभावाला मर्यादा घालणे आणि आयात खर्च नियंत्रणात ठेवणे, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोने-चांदीच्या आयातीवर १५ टक्के शुल्क लागू केले. पंतप्रधान मोदी यांनीही भारतीयांना काही काळ सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सध्या लग्नसराई सुरू आहे. भारतीय परंपरेत लग्नसमारंभात सोन्याला विशेष महत्त्व आहे.
वधूसाठी दागिने खरेदी करणे ही अनेक कुटुंबांची प्राथमिकता असते. त्यामुळे दरवाढ असूनही अनेकांनी आधीच बुकिंग केलेली खरेदी पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नवीन ग्राहकांचा कल येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होईल, असा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यासाठी आधीच सोन्याचे बुकिंग झाले आहे. आता सोने-चांदीच्या आयात शुल्कात १५ टक्के वाढ झाल्याने दरातही वाढ झाली आहे. मात्र, भविष्यात सोने-चांदीचे दर गगनाला भिडतील, अशी शक्यता आहे. सध्याचा काळ सराफा व्यवसायासाठी संकटाचा आहे. ग्राहकांचा कल येत्या दोन ते तीन दिवसांत समजेल. - लकीचंद कटारिया, संचालक, सुनिती ज्वेलर्स बाय लखीचंद.
पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच यापूर्वी काँग्रेस राजवटीतही सोने खरेदी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता मोदींच्या आवाहनाचा सोने खरेदीवर १० ते २० टक्के परिणाम होईल. आयात शुल्कवाढीमुळे सोने-चांदीचे दर वाढले आहेत. मात्र, या दरवाढीमुळे जादा परताव्याच्या शक्यतेने सोन्यातील गुंतवणुकीकडे ग्राहकांचा ओढा वाढेल. - सुनील सोनिगरा, संचालक, के.डी. सोनिगरा ज्वेलर्स
सोने-चांदीवरील आयात शुल्क वाढल्यामुळे ग्राहकांचा कल डिजिटल सोन्याकडे वाढू शकतो. तसेच घरांमध्ये पडून असलेले जुने सोनेही बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारला अधिक महसूल मिळेल. तसेच डॉलरवरील अवलंबित्व कमी होऊन रुपयाला बळकटी मिळण्यास मदत होऊ शकते. - वैभव मोदी, सनदी लेखापाल (सीए)