३५ वर्षांमध्ये प्रथमच १२ ते १४ दिवस अगोदर पोहोचला; २४ तासात मान्सून केरळातून तळकोकणात धडकला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 13:15 IST2025-05-26T13:13:56+5:302025-05-26T13:15:09+5:30
यंदा पाऊस जोरदार बॅटिंग करेल असे संकेत असून पुणे वेधशाळेने पुणे शहर आणि जिल्ह्यात १०५ टक्क्यांहून अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली

३५ वर्षांमध्ये प्रथमच १२ ते १४ दिवस अगोदर पोहोचला; २४ तासात मान्सून केरळातून तळकोकणात धडकला!
पुणे : गेल्या ३५ वर्षांमध्ये प्रथमच यंदा मान्सून राज्यात १२ ते १४ दिवस अगोदर पोहोचला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत रविवारी मान्सून तळकोकणासह कर्नाटक आणि संपूर्ण गोवा राज्यात पोहोचला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. यंदा नैर्ऋत्य मोसमी वारे १३ मे रोजीच अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत मान्सून शनिवारी (दि. २४ मे) वेगाने केरळ व कर्नाटकात दाखल झाला. त्यानंतर वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करून रविवारी मान्सून गोव्यासह कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल झाला आहे. राज्यात मान्सून साधारणपणे ७ जूनच्या दरम्यान दाखल होतो. परंतु यंदा २५ मे रोजीच सुमारे १२ ते १४ दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा आणि देवगडपर्यंत भाग व्यापला. देवगड, बेळगावी, हावेरी, धर्मपुरी, चेन्नई आणि कोहिमा मार्गे मान्सून जात आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाड्याच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत कोकण, गोव्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यंदा जोरदार बॅटिंग करणार
मान्सून गोव्यात साधारणपणे ५ जून व तळकोकणात ७ जून रोजी दाखल होतो. परंतु यंदा १२ ते १४ दिवस लवकर दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सून जवळपास ६ ते १० जूनच्या आसपास दाखल होतो. यंदा मात्र मान्सूनने मे महिन्यातच महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. त्यामुळे यंदा पाऊस जोरदार बॅटिंग करेल असे संकेत असून पुणे वेधशाळेने पुणे शहर आणि जिल्ह्यात १०५ टक्क्यांहून अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.
मागील दहा वर्षांत राज्यात या दिवशी दाखल झाला मान्सून :
वर्षे दाखल तारीख
२०२५ - २५ मे
२०२४ - ६ जून
२०२३ - ११ जून
२०२२ - १० जून
२०२१ - ५ जून
२०२० - ११ जून
२०१९ - २० जून
२०१८ - ८ जून
२०१७ - १० जून
२०१६ - १९ जून
राज्यात बहुतांश भागात अतिवृष्टीची शक्यता
महाराष्ट्रात (दि. २६ ते ३१) पर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हवेचा दाब ९९८ ते १००० इतका आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर प्रचंड राहील. शिवाय सध्या पोषक वातावरण असल्यामुळे संपूर्ण राज्य दोन ते तीन दिवसांत मोसमी पाऊस व्यापेल. तसेच महाराष्ट्रात हवेचा दाब कमी झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये देखील पाऊस कायम राहणार आहे. -डाॅ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ