वर्षात साडेपाच हजार पुणेकरांनी काढला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना; परदेशात ड्रायव्हिंगची वाढली क्रेझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:13 IST2026-04-20T13:12:55+5:302026-04-20T13:13:20+5:30
भारताने करार केलेल्या अनेक देशांमध्ये हा परवाना ग्राह्य धरला जात असून यात अमेरिका, जर्मनी, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांचा समावेश आहे.

वर्षात साडेपाच हजार पुणेकरांनी काढला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना; परदेशात ड्रायव्हिंगची वाढली क्रेझ
पुणे : परदेशात स्वतः वाहन चालवत पर्यटन करण्याकडे पुणेकरांचा कल वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ५ हजार ५५८ नागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (आयडीपी) काढला असून, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे अडीचशेने वाढली आहे.
पुण्यातून परदेशात नोकरी, शिक्षण आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे परदेशात वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची मागणीही सातत्याने वाढत आहे. भारतामधील नागरिकांना परदेशात वाहन चालवायचे असल्यास आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (आयडीपी) घेणे आवश्यक असते. हा परवाना संबंधित नागरिकांच्या स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दिला जातो. २०१८ पूर्वी ही प्रक्रिया पूर्णपणे मॅन्युअल होती. त्यामुळे परवाना मिळण्यास विलंब होत असे. मात्र, नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी २०१८ पासून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. आता अर्जदारांना परिवहन मंत्रालयाच्या ‘सारथी’ पोर्टलवरून अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. या परवान्यासाठी अर्जदाराकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास पुन्हा चाचणी देण्याची गरज नसते. मात्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि व्हिसा यांची पडताळणी केली जाते. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह आरटीओ कार्यालयात जाऊन पडताळणी करावी लागते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एका दिवसात परवाना दिला जातो.
पर्यटनासाठी वाढते महत्त्व
अलीकडच्या काळात परदेशात पर्यटनासाठी जाणारे नागरिक आंतरराष्ट्रीय परवाना काढण्यास प्राधान्य देत आहेत. परदेशात चालकासह वाहन घेणे महागडे ठरत असल्याने अनेकजण स्वतः वाहन चालविण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे त्यांच्या प्रवास खर्चात मोठी बचत होते. भारताने करार केलेल्या अनेक देशांमध्ये हा परवाना ग्राह्य धरला जातो. यात अमेरिका, जर्मनी, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांचा समावेश आहे. हा परवाना जड वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांसाठी वैध असून, त्याची वैधता एक वर्षाची असते. काही देशांमध्ये तो ओळखपत्र म्हणूनही वापरला जातो.
आंतरराष्ट्रीय वाहन परवाना आकडेवारी
वर्ष---- वाहन परवाना
२०२४-२५ --- ५,२६६
२०२५-२६--- ५,५५८
ऑनलाइन अर्ज करून आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढता येतो. याचे नूतनीकरणसुद्धा आता आरटीओ कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने करता येते. त्यामुळे वाहनचालकांना फेऱ्या माराव्या लागत नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढण्याचे प्रमाण वाढत आहे. - स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे