Pune Crime: आधी गोळीबार, मग कोयत्याने वार; क्रूरतेचा कळस गाठत दगडांनी ठेचून केली हत्या, पुण्यात तरुणाचा निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:37 IST2026-04-15T14:36:35+5:302026-04-15T14:37:56+5:30
हल्लेखोरांनी सुरुवातीला गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर धारदार कोयत्याने सपासप वार केले, क्रूरतेचा कळस गाठत हत्या केली

Pune Crime: आधी गोळीबार, मग कोयत्याने वार; क्रूरतेचा कळस गाठत दगडांनी ठेचून केली हत्या, पुण्यात तरुणाचा निर्घृण खून
लोहगाव : शहरात सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह असतानाच, विश्रांतवाडी येथील कॉमर्स झोन परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका १८ वर्षीय तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव गणेश तेलंगी (वय १८, रा. सिंहगड रोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री ११:३० ते १२:३० च्या सुमारास ही घटना घडली. गौरववर तौफिक शेख आणि त्याच्या काही साथीदारांनी जीवघेणा हल्ला केला. प्राथमिक तपासात हा प्रकार जुन्या वादातून घडल्याचे समोर येत आहे.
आधी गोळीबार, मग कोयत्याने वार…
हल्लेखोरांनी सुरुवातीला गौरववर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र गोळीचा नेम चुकला. त्यानंतर संतापलेल्या आरोपींनी धारदार कोयत्याने गौरववर सपासप वार केले. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठत जवळच पडलेले दगड आणि विटांनी गौरवच्या डोक्यावर प्रहार करून त्याला जागीच ठेचून काढले. या अमानुष हल्ल्यात गौरवचा जागीच मृत्यू झाला.
परिसरात दहशतीचे सावट…
या निर्घृण हत्येमुळे कॉमर्स झोन परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची भीषणता इतकी होती की, परिसरातील नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर पडणे टाळले. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिस तपास सुरू...
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. काही संशयितांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले असून, लवकरच मुख्य आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.